सोलापूर : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा सूड उगवण्यासाठी, त्याच्यासह चार मित्रांनी मिळून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला केवळ खुनाचा गुन्हा वाटणाऱ्या या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. पीडित अल्पवयीन मुलाने फिर्याद दिल्यानंतर घटनेमागचे भयानक वास्तव समोर आले आहे.दरम्यान या प्रकरणी ताई चौकात खून झालेल्या तरुणावर पोक्सो अंतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार १६ वर्षांच्या विधीसंघर्ष बालकावर त्याच्याच मित्राने काही दिवसांपूर्वी अत्याचार केला होता. ही लज्जास्पद बाब जेव्हा पीडित मुलाच्या इतर सहकारी मित्रांना समजली. तेव्हा मित्रांच्या मदतीने अत्याचार करणाऱ्याला गाठून त्याचा निर्घृण खून केला. सुरुवातीला पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तेव्हा खुनाचे कारण अस्पष्ट होते. दरम्यान, पीडित अल्पवयीन मुलाने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची फिर्याद देत आपल्यावर अत्याचार करणारा दुसरा कोणी नसून ज्याचा खून झाला तोच आहे, असे सांगितले.
त्यानंतर या प्रकरणात पीडित मुलगा अल्पवयीन असल्याने अत्याचार करणाऱ्या मृतावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक खोमणे हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत .