बार्शी – बार्शीतील दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी (पत्रकार) यांनी अवैध दगड खाणकामाचे फोटो काढून तहसीलदार बार्शी यांना पाठवल्याच्या कारणावरुन घरासमोरच मारहाण करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी पत्रकार प्रशांत चंद्रकांत खराडे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, प्रशांत खराडे (वय ४६), हे दैनिक पुण्यनगरीचे बार्शी तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. रविवारी दि. ३१ मे दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या शिवाजी आखाडा येथील राहत्या घरी विश्रांती घेत असताना त्यांच्या पत्नीने घराबाहेर काही व्यक्ती आल्याची माहिती दिली.
दरवाजातून पाहिले असता घरासमोरील पत्राशेडमध्ये सचिन उर्फ बाळू जाधव व त्याच्यासोबत दोन अनोळखी व्यक्ती उभ्या असल्याचे दिसून आले. त्यानंतर सचिन उर्फ बाळू जाधव याने “तुम्ही सुनिल भराडिया यांच्या दगड खाणीच्या खोदकामाचे फोटो का काढले आणि ते तहसीलदारांना का पाठविले?” असा जाब विचारत पत्रकार खराडे यांची गच्ची धरुन त्यांना मारहाण केली तसेच शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नी रुपाली खराडे तसेच घरकामासाठी आलेल्या मीरा बगाडे (रा. लहुजी चौक, बार्शी) व सुनिता पेटणे (रा. टिळक चौक, बार्शी) यांनाही “तुमचा काही संबंध नाही” असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी प्रशांत खराडे यांनी सचिन उर्फ बाळू जाधव (रा. सुभाष नगर, बार्शी) याच्याविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस प्रमोद केकाण करीत आहेत.
Post Views: 8