
सोलापूर – महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ, सोलापूर अंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ‘समग्र शिक्षा’ योजनेअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक पुरवठा व वितरणाचा शुभारंभ आज, सोमवार दिनांक ०१ जून २०२६ रोजी उत्साहात करण्यात आला. बालभारती, पुणे यांच्या पोर्टलवरील माहितीनुसार सोलापूर मनपा क्षेत्रासाठी पहिल्या टप्प्यात ७४.८२% पाठ्यपुस्तके प्राप्त झाली असून, त्याचे शाळांनिहाय नियोजनबद्ध वाटप सुरू झाले आहे.
आज वितरणाच्या पहिल्या दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील २२ उर्दू माध्यमाच्या शाळांना इयत्ता १ ली, २ री, ५ वी, ७ वी आणि ८ वी ची सर्व प्राप्त पाठ्यपुस्तके, तसेच इयत्ता ३ री व ४ थी ची इंग्रजी विषयाची पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली. यासोबतच शहरातील कन्नड माध्यमाच्या १४ शाळा (मनपा व अनुदानित खाजगी), तेलगू माध्यमाच्या ०३ शाळा (मनपा व अनुदानित खाजगी) आणि हिंदी माध्यमाच्या ०२ खाजगी अनुदानित शाळांना प्राप्त झालेल्या पाठ्यपुस्तकांचे सुरळीत वाटप करण्यात आले.
*बुधवारपासून मराठी माध्यमाचा टप्पा*
प्राप्त झालेल्या पाठ्यपुस्तकांचे दि. ०१ जून ते १० जून २०२६ यु-डायस प्रमाणे, २०२६-२७ आणि सेवक संचानुसार शाळांना वाटप करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार येत्या बुधवारपासून बीटनिहाय मराठी माध्यमाच्या शाळांना इयत्ता १ ली, २ री, ३ री, ४ थी, ५ वी, ७ वी व ८ वी ची सर्व प्राप्त पाठ्यपुस्तके, तसेच इयत्ता ६ वीच्या ‘हिंदी सुलभभारती’ विषयाच्या पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे.
पाठ्यपुस्तक पुरवठ्याची सद्यस्थिती (आकडेवारी):
बालभारतीकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सोलापूर मनपा क्षेत्रातील एकूण मागणी आणि पुरवठ्याचे गणित खालीलप्रमाणे आहे
तपशील पाठ्यपुस्तकांची संख्या
एकूण मागणी (पुस्तके) ४,२४,२४४
एकूण प्राप्त (पुस्तके) ३,१७,४१५
उर्वरित अप्राप्त (पुस्तके) १,०६,८२९
प्राप्तीची टक्केवारी ७४.८२%
*उर्वरित पुस्तके १० जूनपर्यंत मिळणार*
सध्या अप्राप्त असलेली १,०६,८२९ पाठ्यपुस्तके बालभारती, पुणे यांच्याकडून दि. १० जून २०२६ पर्यंत प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. ही पुस्तके उपलब्ध होताच दुसऱ्या टप्प्यात संबंधित शाळांना तातडीने वितरित केली जातील, अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली.
आजच्या या पुस्तक वाटप प्रक्रियेचा शुभारंभ मा. प्रशासनाधिकारी मल्हारी माने आणि बालभारती मराठी पाठ्यपुस्तक मंडळाचे माजी कार्यगट सदस्य पद्माकर कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी समग्र शिक्षा अभियान पाठ्यपुस्तक प्रमुख रियाज आत्तार, पर्यवेक्षक निलोफर सय्यद, नितीन अंकुश जाधव, अमोल गायकवाड, लक्ष्मण पुजारी, ज्ञानेश्वर गरड, अमोल धस, रूपाली कैंची, सुवर्णा गुरव, प्रफुल्ला कदम, प्रभात चव्हाण, उमादेवी मुंडे, गणेश नांदवटे, नईम मुच्छले आणि प्रसन्न देवनेुर आदी उपस्थित होते. पहिल्या दिवशी सर्व शाळांचे प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या समन्वयामुळे वाटप प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे पार पडले.























