सोलापूर : शहरातील एका खासगी जागेवर तब्बल 118 पेक्षा अधिक झाडांची बेकायदेशीरपणे तोड करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन उंबासे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपमहापौर देवकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
संबंधित जागा खासगी मालकीची असली तरी झाडतोडीसाठी आवश्यक परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. 2019 च्या झाड संवर्धन आणि संरक्षण नियमांनुसार शहर अथवा ग्रामीण भागात कोणतेही झाड तोडण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे.
महापालिकेला प्राप्त झालेल्या सातबारा उताऱ्यानुसार संबंधित जागेचे मालक म्हणून अंकित शिवानंद पाटील, शिवानंद पाटील, आशा हजारे आणि राजेंद्र हजारे यांची नावे समोर आली आहेत. या चौघांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले की, झाडतोड प्रकरणात दोषींवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. संबंधितांनी दंडाची रक्कम भरली नाही तर त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवून कायदेशीर मार्गाने वसुली करण्यात येईल. महापालिका अधिनियमांतर्गत उपलब्ध अधिकारांचा वापर करून कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेमुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
Post Views: 7