सोलापूर : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूरच्या संगणक अभियांत्रिकी (CSE) विभागाने कॅम्पस प्लेसमेंटमध्ये पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन केले असल्याचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी सांगितले.
देशातील अग्रगण्य आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मध्ये संगणक अभियांत्रिकी विभागातील तब्बल नऊ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, यामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण व उद्योगाभिमुख प्रशिक्षणाला आणखी एक भक्कम मान्यता मिळाली आहे.
यापैकी तीन विद्यार्थ्यांची टीसीएसच्या प्रतिष्ठित डिजिटल प्रोफाइलसाठी निवड झाली असून त्यांना वार्षिक ७ लाख रुपयांचे पॅकेज प्राप्त झाले आहे. तर सहा विद्यार्थ्यांची निंजा प्रोफाइलसाठी निवड होऊन त्यांना वार्षिक ३.३६ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे.
टीसीएसच्या डिजिटल प्रोफाइलसाठी मानसी स्वद्दे, सौरभ आगलावे आणि अंबादास गोटे या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. तसेच अपेक्षा फुलारी, कार्तिक पनगंटी, मुकुंद बोगा, श्रेयश शास्त्रे, तेजस हुच्चे आणि सौरव भोसले या विद्यार्थ्यांची निंजा प्रोफाइलसाठी निवड झाली आहे.
महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने उद्योगाभिमुख प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्य विकास कार्यशाळा, कोडिंग सराव, मॉक इंटरव्ह्यू, गटचर्चा, व्यक्तिमत्त्व विकास सत्रे तसेच सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण आयोजित केले जाते. याचबरोबर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी विशेष उपक्रम राबविले जातात. या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम प्लेसमेंटमध्ये दिसून येत असल्याचे सांगितले.
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सिंहगड केगाव कॅम्पसचे संचालक संजय नवले म्हणाले, “आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून विद्यार्थ्यांनी उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार स्वतःला सतत अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानाबरोबरच व्यावसायिक कौशल्ये, संवाद कौशल्ये आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्यावर भर दिला जातो. टीसीएससारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीत विद्यार्थ्यांची झालेली निवड ही त्यांच्या परिश्रमांची आणि महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरणाची पावती आहे. आगामी काळात आणखी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्यांमध्ये संधी मिळतील, असा विश्वास आहे.”
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सहसचिव तथा केगाव कॅम्पसचे संचालक संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विकास मराठे, सीएसई विभागप्रमुख प्रा. एच. टी. गुरमे तसेच सहायक प्लेसमेंट समन्वयक प्रा. सुरज धनवे यांनी अभिनंदन केले. सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा देत त्यांच्या यशाचे कौतुक केले.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सातत्याने मिळत असलेल्या प्लेसमेंटच्या संधींमुळे एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय हे गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण व रोजगाराभिमुख प्रशिक्षणासाठी परिसरात एक विश्वासार्ह शैक्षणिक केंद्र म्हणून आपली ओळख अधिक मजबूत करत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
Post Views: 15