बार्शी – जागतिक नेत्रदान दिनानिमित्त सोजर कॉलेज ऑफ फार्मसी, खांडवी (बार्शी) येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्यावतीने ग्रामपंचायत खांडवी येथे मोफत नेत्रतपासणी शिबीर, नेत्रदान जनजागृती अभियान व समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम समर्थ आय केअर अँड ऑप्टिकल्स यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात हनुमान पूजनाने करण्यात आली. यानंतर प्रमुख नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रदीप मुंढे तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. मुंढे यांनी उपस्थित नागरिकांची नेत्र तपासणी करुन आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच नेत्रदानाचे महत्त्व, त्याबाबत असलेले गैरसमज आणि समाजातील जनजागृतीची गरज याविषयी समुपदेशन सत्र घेतले.
या शिबिरात एकूण १०२ लाभार्थ्यांनी मोफत नेत्रतपासणीचा लाभ घेतला. कार्यक्रमात ३० राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवून लाभार्थी नोंदणी, शिबीर व्यवस्थापन व जनजागृती उपक्रम यशस्वीपणे पार पाडले.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. शिवाजी पाटील व संतोष मोकाशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रंथपाल आसिफ आतार, अक्षय रिकिबे व लतीफ पटेल यांनी विशेष सहकार्य केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजित करपे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये नेत्र आरोग्य व नेत्रदानाबाबत जागरुकता निर्माण झाली. उपस्थित ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक करुन अशा समाजोपयोगी कार्यक्रमांची आवश्यकता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सर्व मान्यवर, ग्रामस्थ, स्वयंसेवक व सहकार्य करणाऱ्या संस्थांचे आयोजकांनी आभार मानले.
सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडल्याबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक अरुणदादा बारबोले व सचिवा सौ. कल्पनाताई बारबोले यांनी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे कौतुक करुन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.