अक्कलकोट – ५ जणांचा जीव वाचवणाऱ्या धाडसी युवक इरफान याचा महाराष्ट्र शासनाने शासकीय पातळीवर सन्मान करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकतावादी) चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तथा रोजगार आघाडी प्रदेशाध्यक्ष विकीबाबा चौधरी यांनी केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे यात्रेकरूंना घेऊन जाणारे चारचाकी वाहन विहिरीत कोसळून 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
समोरचे वाहन विहिरीत कोसळल्याचे पाहताच इरफान यांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीसाठी धाव घेतली. गावकऱ्यांना तत्काळ माहिती देत त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उडी घेतली.
इरफान यांनी सर्वप्रथम एका ४ वर्षीय चिमुकल्याला सुरक्षित बाहेर काढले आणि त्यानंतर आणखी तीन जणांचे प्राण वाचवले. संकटाच्या क्षणी जात, धर्म, पंथ यांचा विचार न करता त्यांनी दाखवलेले धाडस व सेवाभाव प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
*विकीबाबा चौधरी म्हणाले की*, “इरफानने दाखवलेले धाडस व माणुसकीचे दर्शन संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. अशा धाडसी युवकांचा शासनाने तात्काळ सन्मान करून त्यांच्या कार्याची दखल घ्यावी. यामुळे समाजात चांगले काम करणाऱ्या युवकांना प्रोत्साहन मिळेल.”
*पुढे बोलताना त्यांनी सांगितले* की, संकटाच्या वेळी जात-धर्म न पाहता केवळ माणुसकी म्हणून मदतीला धावून जाणे हेच खरे महाराष्ट्राचे संस्कार आहेत. इरफानने ते कृतीतून दाखवून दिले आहे. शासनाने त्याला ‘जीवन रक्षक’ पुरस्कार देऊन गौरव करावा, अशी मागणीही चौधरी यांनी यावेळी केली.
Post Views: 16