
सोलापूर – लिटिल चॅम्प क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात सलीम खान संघाने दास्ताने संघाचा ३० धावांनी पराभव करत शानदार विजय मिळवला. आदित्य चाटके याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सलीम खान संघाने सामन्यावर आपले वर्चस्व गाजवले.
जुळे सोलापुरातील भंडारी क्लबच्या मैदानावर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सलीम खान संघाने निर्धारित ३० षटकांत ९ बाद १६६ धावांची मजबूत धावसंख्या उभारली. त्यांच्याकडून आदित्य चटके याने ३२ चेंडूंत ३ चौकारांसह नाबाद ३० धावांची खेळी केली. त्याला लक्ष्मण याने २४ धावांचे आणि अर्णव भोसले याने ५ चौकारांच्या मदतीने नाबाद २३ धावांचे योगदान दिले. दास्ताने संघाकडून गोलंदाजी करताना हर्षवर्धन सेन याने ३ षटकांत १२ धावा देऊन २ बळी घेतले.
१६७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दास्ताने संघाचा डाव २६.५ षटकांत १३६ धावांवरच आटोपला. सलीम खान संघाच्या तबीश कांबळे याने घातक गोलंदाजी करत अवघ्या ३ षटकांत ८ धावा देऊन ४ फलंदाजांना बाद केले. त्याला आदित्य राठोड याने ९ धावांत २ बळी आणि आदित्य चाटके याने ५ धावांत २ बळी घेत सुरेख साथ दिली. दास्ताने संघकडून हर्षवर्धन सेन याने ४ धावा केल्या आणि २ बळी घेतले, त्याच्या या कामगिरीसाठी त्याला ‘फायटर ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले.
उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या सलीम खान संघाच्या आदित्य चाटके याला ‘सामनावीर’ आणि ‘सर्वोत्कृष्ट फलंदाज’ म्हणून निवडण्यात आले. तर तबीश कांबळे याला ‘सर्वोत्कृष्ट गोलंदाज’चा मान मिळाला.




















