सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त, एकसूत्रीपणा आणि प्रशासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याच्या उद्देशाने महापालिकेने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. १५ जुलै २०२६ पासून ड्रेस कोडची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
यासंदर्भातील आदेश आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी जारी केला आहे.
महापौर विनायक कोंड्याल यांच्या निर्देशानुसार महापालिकेतील वर्ग ‘ब’ ते ‘ड’ मधील कायम, मानधन व कंत्राटी स्वरूपातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी हा ड्रेसकोड लागू राहणार आहे. पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निळ्या रंगाचा लायनिंग शर्ट व गडद निळ्या रंगाची (नेव्ही ब्ल्यू ) पँट निश्चित करण्यात आली आहे. तर महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी फिकट जांभळ्या रंगाची साडी अथवा त्याच रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान करणे बंधनकारक राहणार आहे. आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना यापूर्वी निश्चित करण्यात आलेला ड्रेसकोडच लागू राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
ड्रेसकोड खरेदीसाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला एक हजार रुपयांची खर्च अदायगी महापालिकेकडून देण्यात येणार आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठीही हीच तरतूद लागू असून संबंधित मक्तेदारांनी प्रथम ड्रेस उपलब्ध करून दिल्यानंतर खर्चाची परतफेड करण्यात येणार आहे.
कार्यालयीन वेळेत स्वच्छ व नीटनेटका गणवेश परिधान करणे तसेच ओळखपत्र लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. टी-शर्ट घालून कार्यालयात येण्यास मनाई करण्यात आली आहे. ड्रेसकोडचे पालन न करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर १०० रुपयांचा दंड आकारण्याचे अधिकार संबंधित विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत.
महापालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांची ओळख पटविणे सोपे होणार असून कामकाजात अधिक शिस्त व पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होणार आहे.
ड्रेसकोड आदेशातील ठळक महत्त्वाचे मुद्दे –
— १५ जुलै २०२६ पासून अंमलबजावणी
— पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र गणवेश
— महिलांसाठी फिकट जांभळ्या रंगाची साडी किंवा पंजाबी ड्रेस निश्चित.
— एक हजार रुपयांचा ड्रेस भत्ता
— ओळखपत्र व स्वच्छ गणवेश बंधनकारक , टी-शर्टला मनाई
— नियमभंगास १०० रुपये दंड वसूलीचे अधिकार विभागप्रमुखांना
Post Views: 47