सोलापूर – संतश्रेष्ठ ब्रह्मांडनायक श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान हजारो भाविकांचे श्रद्धास्थान ठरणाऱ्या उळे (ता. दक्षिण सोलापूर) गावातील सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी विकासनिधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्याकडे केली आहे. संतश्रेष्ठ ब्रह्मांडनायक श्री गजानन महाराजांच्या पालखी मुक्कामाच्या ठिकाणी भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग आणि सेस फंडातून निधीची तरतूद करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे यांनी याबाबत प्रशासनाकडे निवेदन सादर केले असून पालखी मुक्कामस्थळी तात्पुरते तसेच कायमस्वरूपी पत्राशेड उभारणे, पथदिवे, रस्त्यांची डागडुजी करणे आणि इतर आवश्यक कामांसाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे. पालखी सोहळ्याच्या काळात मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक उळे गावात दाखल होतात. त्यामुळे मुक्कामस्थळी सावली, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि सुरक्षित वाहतुकीसाठी मूलभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यासंदर्भात ग्रामपंचायत विभागामार्फत किरकोळ आणि तातडीच्या कामांसाठी पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कायमस्वरूपी पत्रा शेड उभारणी आणि रस्ते विकासासाठी स्वतंत्र निधीचे नियोजन करण्याबाबत प्रशासन स्तरावर सकारात्मक हालचाली सुरू झाल्याची माहिती नेताजी खंडागळे यांनी दिली.
Post Views: 11