सोलापूर : प्रभाकर महाराज मंदिर परिसरातील डीपी रस्त्यावरच आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचत असल्याने शॉक लागण्याची भीती आहे. महापालिकेने तातडीने उपाययोजना करून हा डीपी उंचावर बसवावा. याच परिसरात अस्वच्छतेकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
शहरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रभाकर महाराज मंदिर चौक ते शिंगवी भवनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील महापालिकेच्या विद्युत डीपीमुळे संभाव्य अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या डीपीमधून रस्त्यावरील पथदिवे सुरू-बंद करण्याचे काम केले जाते. मात्र, संबंधित ठिकाणी पावसाचे पाणी वारंवार साचत असल्याने जोरदार पावसात डीपीला पाणी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.डीपीला पाणी लागल्यास विद्युत प्रवाह रस्त्यावर साचलेल्या पाण्यात उतरून नागरिकांना शॉक बसण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
दरम्यान, यासंदर्भात ज्येष्ठ फोटोग्राफर जयजीत पटवा यांनी सोलापूर महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले असून, संबंधित डीपी जमिनीपासून किमान तीन फूट उंचावर बसवून संभाव्य अनर्थ टाळावा, अशी मागणी केली आहे.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत महापालिका प्रशासनाने या ठिकाणाची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
Post Views: 16