सोलापूर : आसरा चौक ते साखर कारखाना या होटगी रस्त्यावरील नैसर्गिक नाल्यावर झालेल्या अतिक्रमणांमुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत असून, रस्त्यावर जलसाचल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर नाल्यावरील अतिक्रमणे तातडीने हटवून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करावा, अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजयकुमार हत्तुरे यांनी सोलापूर महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात हत्तुरे यांनी नमूद केले आहे की, विमानतळ, हत्तुरे वस्ती, होटगी रोड परिसरातील भाग्यश्री पार्कमधून जाणारा नैसर्गिक नाला अनेक ठिकाणी अतिक्रमणामुळे अरुंद झाला आहे. परिणामी पावसाचे पाणी नाल्यातून वाहून जाण्याऐवजी रस्त्यावर साचत असून, आसरा चौक ते साखर कारखाना मार्गावर वारंवार जलकोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, मुसळधार पावसात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
महापालिकेने तातडीने संबंधित ठिकाणाची पाहणी करून नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमणे हटवावीत, नाल्याची सर्वंकष साफसफाई करावी आणि पाण्याचा प्रवाह सुरळीत राहील, अशा उपाययोजना त्वरित हाती घ्याव्यात. नागरिकांची सुरक्षितता, वाहतुकीची सुविधा आणि भविष्यातील संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने विलंब न करता कारवाई करावी, अशी मागणी हत्तुरे यांनी केली आहे.
Post Views: 20