
सोलापूर – ‘लव्ह जिहाद’चे संकट आता केवळ ठराविक वस्त्या किंवा ग्रामीण भागापुरते मर्यादित राहिलेले नसून, ते उच्चभ्रू समजल्या जाणार्या कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत पोहोचले आहे. नाशिकमधील ‘टीसीएस’ कंपनी, मुंबईतील ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ आणि पुण्याच्या ‘विप्रो’ कंपनीत अलीकडच्या काळात उघडकीस आलेल्या घटना हे याचेच स्पष्ट संकेत आहेत. हा प्रकार केवळ हिंदु मुलींवर नव्हे, तर थेट हिंदु धर्मावर घातलेला घाला आहे. या भयावह संकटाचा सामना करण्यासाठी हिंदु युवती आणि महिलांनी धर्माचरण व संस्कृतीचे निष्ठेने पालन करणे हाच एकमेव प्रभावी उपाय आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २८ जून रोजी शिवस्मारक सभागृहात ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि त्यांवरील उपाययोजना’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या कु. वर्षा जेवळे यांनी ‘तणावमुक्त जीवनासाठी साधना’ या विषयावर उपस्थितांना संबोधित केले. या कार्यक्रमाला सनातन संस्थेच्या संत पू. दीपाली मतकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या व्याख्यानाला सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि महिला-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
श्री. राजन बुणगे पुढे म्हणाले की, ‘लव्ह जिहाद’चा ऐतिहासिक संदर्भ मांडला. वर्ष 711 मध्ये महंमद बिन कासीमच्या आक्रमणापासून ते गझनी, घोरी, बाबर यांच्या काळातील अत्याचारांचा दाखला देत त्यांनी सांगितले की, केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळातच महिलांना वास्तविक सन्मान आणि सुरक्षा मिळाली. त्यानंतर 1947 च्या वेळी झालेली देशाची फाळणी, वर्ष 1971 मध्ये झालेली बांगलादेशची निर्मिती, 1990 मध्ये काश्मीरमध्ये झालेला हिंदूंचा नरसंहार, वर्ष 1992 मध्ये ‘अजमेर सेक्स स्कँडल’सारखी मोठी घटना घडली ज्यात 250 पेक्षा अधिक हिंदू युवती बळी पडल्या आहेत. हिंदु महिला आणि युवती यांच्यावर झालेले अत्याचार तेव्हापासून आतापर्यंत चालूच आहेत. ‘लव्ह जिहाद’ हे हिंदु संस्कृती, हिंदु धर्म संपवण्याचे मोठे षडयंत्र आहे.
या वेळी कु. वर्षा जेवळे म्हणाल्या की, आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तणाव ही समाजाला भेडसावणारी प्रमुख समस्या बनली आहे. देहली येथील ‘सेंटर ऑफ हिलिंग’ या संस्थेने १०,००० लोकांच्या केलेल्या अभ्यासात असे आढळून आले होते की, कोरोना महामारीनंतर ७४ % लोक ताणतणावात, तर ८८ % लोक काळजी आणि चिंता यांनी ग्रस्त आहेत. बहुतांश लोक तणाव-निर्मूलनासाठी शारीरिक स्तरावर उपाययोजना करतांना ‘कामावरून सुट्टी घेणे’, ‘निसर्गाच्या सानिध्यात रहाणे’ किंवा ‘सहलीला जाणे’ असे विविध प्रयत्न करतात. या उपायांचा परिणाम तात्पुरता असतो. थोड्याच कालावधीत तो तणाव पूर्ववत होतो. तणाव नियंत्रणासाठी ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ प्रभावी ठरते. या अंतर्गत कोणत्या स्वभावदोषामुळे तणाव उत्पन्न होतो, त्या व्यक्तीमत्वाच्या दोषावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वत:च्या बुद्धीद्वारे आंतरिक मनाला सूचना कशी द्यावी, हे शिकवले जाते. या स्वयंसूचना आपल्या विचारांमध्ये आणि भावनांमध्ये बदल घटवून आणण्यासाठी साहाय्य करतात. तणाव नियंत्रणासाठी प्रणायाम-योगासने यांसह आध्यात्मिक उपाययोजना प्रभावी आहेत. उत्तम आरोग्य महणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक दृष्टीने सकारात्मक स्थिती असणे. आपापल्या ईष्ट देवतेच्या नामजपाद्वारे केलेले ध्यान मन शांत करते आणि तणाव कमी करते. नामजप सातत्याने केल्याने व्यक्तीच्या मनातील नामजपाचे संस्कारकेंद्र दृढ होते, त्यामुळे निरर्थक विचारांमुळे खर्च होणारी मनाची शक्ती वाचते आणि मन एकाग्र होऊ लागते. नामजप रक्तदाब आणि हृदयगती कमी करण्यास मदत करतो.






















