जालना : जालना शहरात प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे सध्या
मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन
करावा लागत आहे. शहरातील काद्राबाद, बडी सडक तसेच विविध गल्ल्यांमधील
वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर तात्काळ
उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा
शिवसेना संपर्कप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी केली आहे.
अंबड चौफुली ते मंठा चौफुली या मार्गावरील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम
आणि पुढे कुंडलिका नदीवरील रोहणवाडी रस्त्यावरील नवीन पुलाच्या
बांधकामामुळे हा मुख्य मार्ग गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. नदीवरील
पुलाच्या कामासाठी तयार करण्यात आलेला लाखो रुपये खर्चाचा वळण रस्ता
पहिल्याच पावसात वाहून गेल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
निर्माण झाले आहे.
या मार्गावरील वाहतूक नेमकी कोणत्या पर्यायी मार्गाने वळवायची याचे
कोणतेही नियोजन प्रशासनाने केलेले नाही. त्याचबरोबर हनुमान घाट, मुर्गी
तलाव परिसर तसेच काही दिवसांपूर्वी काद्राबाद झेंडा परिसरातही रस्त्यांची
खोदाई करण्यात आल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.
शहरात वारंवार निर्माण होणारी वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक
पोलिसांची यंत्रणा देखील प्रभावीपणे कार्यरत दिसत नसल्याची टीका
भास्करराव अंबेकर यांनी केली. अनेक ठिकाणी नाल्यांवरील ढापे तुटलेल्या
अवस्थेत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील नागरिकांना या वाहतूक कोंडीच्या मनस्तापातून मुक्त करण्यासाठी
प्रशासनाने तातडीने वाहतूक नियोजन करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी
मागणी माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना संपर्कप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















