सोलापूर : सोलापूर शहरासह राज्यात गाजलेल्या महापालिका भांडार गोडाऊनमधील भंगार चोरी प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर महापालिकेच्या अंतर्गत चौकशीत ठपका ठेवण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी १३ जणांतील ९ जणांवर दंडासह विविध प्रकारची शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी काढलेल्या या आदेशामुळे महापालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
या कारवाईत सेवानिवृत्तीनंतर मानधनावर नियुक्त करण्यात आलेले अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांच्यावर सर्वाधिक कठोर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना १ लाख २० हजार रुपये दंड, पाच वर्षे पेन्शनमधील २५ टक्के रक्कम कपात तसेच महापालिकेच्या कोणत्याही विभागात भविष्यात पुनर्नियुक्ती न देण्याचा कायमस्वरूपी प्रतिबंध घालण्यात आला आहे. महापालिकेच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी शिस्तभंगाची कारवाई मानली जात असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागातून सेवानिवृत्त झाल्यानंतर जगन्नाथ बनसोडे यांची प्रशासनाने मानधनावर पुनर्नियुक्ती केली होती. शहरातील विविध भागांत अतिक्रमण कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले खोके, लोखंडी साहित्य, पत्रे व इतर भंगार साहित्य महापालिकेच्या पाठीमागील नगर अभियंता भांडार गोडाऊनमध्ये ठेवण्यात येत होते. दि. १८ मे २०२६ रोजी दुपारच्या सुमारास अतिक्रमण कारवाईत आणलेले भंगार साहित्य वाहनातून नेत असताना नगरसेवक अमोल शिंदे यांनी संबंधितांना रंगेहाथ पकडले होते. चौकशीत या प्रकारामागील विविध बाबी उघडकीस आल्या असून, अशाच पद्धतीने अनेक दिवसांपासून भंगार साहित्याची चोरी सुरू असल्याचे समोर आले होते.
या घटनेनंतर महापालिकेच्या भांडार परिसरात मोठा गोंधळ उडाला होता. महापालिका आयुक्तांसह पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आयुक्तांच्या आदेशानुसार उपअभियंता अविनाश वाघमारे यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधिकारी जगन्नाथ बनसोडे, कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार, सेवक, मजूर व वाहनचालकांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, यानंतर या प्रकरणाच्या विभागीय चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी अधिकारी, कर्मचारी, मजूर व संबंधितांचे जबाब नोंदवून सविस्तर चौकशी केली. तपासाअंती १३ जणांवर ठपका ठेवणारा अहवाल त्यांनी दि. १२ जून २०२६ रोजी महापालिका आयुक्तांकडे सादर केला. या अहवालाचा अभ्यास करून आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी संबंधितांवर विविध प्रकारची कारवाई करत आदेश काढले.
असा आहे प्रकरणाचा घटनाक्रम…
१८ मे २०२६ – महापालिका भांडारातून भंगार चोरीची घटना.
१८ मे २०२६ – सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
१९ मे २०२६ पासून – पोलिसांचा तपास सुरू.
२० ते २८ मे २०२६ – आरोपींची कसून चौकशी.
जगन्नाथ बनसोडे यांनी जामिनासाठी दाखल केलेला अर्ज न्यायालयातून मागे घेतला.
अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्याकडे विभागीय चौकशीचे आदेश.
१२ जून २०२६ – चौकशी अहवाल आयुक्तांकडे सादर.
३० जून २०२६ – आयुक्तांकडून कारवाईचे आदेश.
—
या तीन अधिकारी , एका सेवकाला सक्त ताकीद
महापालिका आयुक्तांनी नगर अभियंता सारिका अकुलवार, तत्कालीन नियंत्रण अधिकारी तपन डंके आणि या प्रकरणात पोलिसात फिर्याद दाखल करणारे उपअभियंता अविनाश वाघमारे यांना सक्त ताकीद दिली आहे. तर कायम मजूर सेवक सुरज राजू डोलारे यांनाही सक्त ताकीद देण्यात आली आहे.
कोणावर कोणती झाली कारवाई…
१. अतिक्रमण प्रतिबंधक विभाग अधिकारी जगन्नाथ बनसोडे – ५ वर्षे मिळणाऱ्या पेन्शनमधून २५ टक्के रक्कम कपात, १ लाख २० हजार रुपये दंड आणि कोणत्याही विभागात पुनर्नियुक्तीवर कायमस्वरूपी प्रतिबंध.
२. मानधन कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार – १ लाख २० हजार रुपये दंड.
३. कायम मजूर सचिन शिवलाल गाडे – सेवेतून निलंबित.
४. कनिष्ठ लिपिक विनोद चंदनशिवे – एक वेतनवाढ रोखली.
५. कनिष्ठ लिपिक अशोक बिराजदार – एक वेतनवाढ रोखली.
६. कायम मजूर विश्वजीत कांबळे – एक वेतनवाढ रोखली.
७. कायम मजूर गौतम लोखंडे – एक वेतनवाढ रोखली.
८. मक्तेदार मजूर (बीव्हीजी कंपनी) नरसिंग परदेशी – कायमचा घरचा रस्ता, दोन महिन्यांचे वेतन वसूल करून महापालिकेत जमा करणे आणि कायमस्वरूपी पुनर्नियुक्ती नाही.
९. मक्तेदार मजूर नवनाथ बेळळे – दोन महिन्यांचे वेतन इतके दंड वसूल होणार
१०. कायम मजूर सेवक सुरज डोलारे – सक्त ताकीद.
Post Views: 18