सांगोला – आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना दर्जेदार, तत्पर व अखंडित आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग सज्ज असून या अनुषंगाने कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नियोजन व आढावा बैठक जि.प.शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत वारी मार्गावरील आरोग्य सुविधा, वैद्यकीय पथकांची नियुक्ती, औषधसाठा, रुग्णवाहिका व्यवस्था, आपत्कालीन उपचार सेवा, चरण सेवा, मुख्यमंत्री वारकरी सुविधा उपचार केंद्र, मुख्यमंत्री वारकरी निवारा उपचार केंद्र, मुख्यमंत्री आरोग्य रथ, आरोग्यदूत, मेडिसिन किट, उष्माघात व संसर्गजन्य आजारांवरील प्रतिबंधात्मक उपाययोजना, स्वच्छता आणि प्रत्येक पालखी सोबत एएलएस रुग्ण वाहिका देण्यात यावी अशी सूचना देण्यात आली. तसेच वारकऱ्यांना तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस आरोग्य समिती सदस्य व्यंकटराव भालके, नागनाथ भोसले, शोभा खटकाळे, सविता कोकाटे, संगीता दुधाळ, जिल्हा वैद्यकीय अधिकारी सतीश कोपुरवाड तसेच आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
चौकट-
वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज
आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती आणि सेवाभावाची अखंड परंपरा आहे. लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर समाजाप्रती असलेली आपली सेवा आहे. प्रत्येक वारकऱ्याला वेळेत, सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने सज्ज असून सर्व यंत्रणांनी समन्वयाने व तत्परतेने कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-चेतनसिंह केदार सावंत, सभापती, जि.प.शिक्षण व आरोग्य समिती