सोलापूर – लिटिल चॅम्प १२ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत डॉ. देशपांडे संघ आणि श्रीनिवास शिवाळ संघाने आपापल्या सामन्यात ८ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवले. दोन्ही संघांनी उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना नमवून स्पर्धेत आगेकूच केली आहे.
जुळे सोलापुरातील भंडारी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात हेमंत हबीब संघाने प्रथम फलंदाजी करताना १६.५ षटकांत ९ बाद ६३ धावा अशी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात डॉ. देशपांडे संघाने अवघ्या ८.५ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात ६४ धावा करत विजय सुकर केला. या सामन्यात डॉ. देशपांडे संघाच्या दक्ष मोरे याने प्रभावी गोलंदाजी केली. त्याने ३ षटकांत अवघ्या ५ धावा देऊन २ बळी घेतले. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. या सामन्यासाठी पंच म्हणून सोम्या अडकी व चंदू मंजेली यांनी काम पाहिले.
दुसऱ्या एका सामन्यात खुद्दुस खान संघाने प्रथम फलंदाजी करताना २९.५ षटकांत सर्वबाद ९८ धावा केल्या. विजयासाठी मिळालेले ९९ धावांचे आव्हान श्रीनिवास शिवाळ संघाने अवघ्या १२.१ षटकांत २ गडी गमावून १०१ धावा करत सहज पार केले. श्रीनिवास शिवाळ संघाच्या प्रणव शिंदे याने अष्टपैलू कामगिरी बजावत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने ८ षटकांत १९ धावा देऊन ४ बळी घेतले, तसेच फलंदाजीत १२ चेंडूंत नाबाद ४ धावा केल्या. त्याला या सामन्याचा ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात अशोक डोंबाळे व मोहसिन मुल्ला यांनी पंच म्हणून, तर शुभम मुत्तूर यांनी स्कोरर म्हणून जबाबदारी सांभाळली.






















