बार्शी – नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत प्रभाग क्र.२० मधून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) (आमदार सोपल) गटाचे विद्यमान नगरसेवक मुजम्मील जहांगिर पठाण हे विजयी झाले आहेत. परंतु, त्यांना तीन अपत्य असल्यामुळे ते महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम १६ अन्वये नगरसेवक पदासाठी अपात्र आहेत. त्यामुळे त्यांचे पद रद्द करावे, अशी मागणी माजी नगरसेवक ॲड. महेश जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्जाद्वारे केलेली आहे.
शासन नियमानुसार कोणत्याही सार्वत्रिक निवडणूकीत तीन अपत्य असणाऱ्या व्यक्तीस निवडणूक लढवता येत नाही. परंतु वास्तविक नगरसेवक मुजम्मील पठाण यांना तीन अपत्य असतानाही त्यांनी निवडणूक आयोगासह, शासनाची फसवणूक करुन निवडणूक लढवत ती जिंकलीही आहे. त्यामुळे नगरपरिषद व नगरपंचायती कायद्यान्वये त्यांचे नगरसेवक पद रद्द व्हावे, अशी मागणी श्री. महेश जगताप यांनी केली आहे.
नगरपरिषद प्रशासन अधिकारी आशिष लोकरे यांनी ऍड. जगताप यांच्या तक्रारी अर्जाचा संदर्भ देत नगरसेवक मुजम्मील पठाण यांना सात दिवसाच्य्या आत आपले म्हणणे मांडून खुलासा करावा अशी नोटीस दि. १ जुलै २०२६ रोजी दिली आहे. याबाबत प्रभाग क्रमांक २० सह बार्शी शहरातील नागरिक हवालदील झाले असून पठाण यांचे नगरसेवक पद जाणार का? किंवा कसे? याबाबत शहरवासीयांत उत्सुकता लागली आहे.
सदर नगरसेवक मुजम्मील पठाण यांनी केलेले दखलपात्र फौजदारी गुन्हयाबाबत श्री. जगताप हे कायदेशीर फौजदारी कारवाई करणार असलेची माहिती मिळालेली आहे.
Post Views: 31