पंढरपूर – शहरातील यमाई तलावालगतची सुमारे ३.१२ हेक्टर जागा आणि त्या ठिकाणी शासनाने आरक्षित केलेल्या पिकनिक स्पॉटचे आरक्षण बदलून ती जागा श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला गोशाळा विस्तारासाठी देण्याचा निर्णय नगरपरिषदेला विश्वासात न घेता घेतल्याचा आरोप करत नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ पंढरपूर नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा तातडीने बोलवावी, अशी मागणी नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके यांच्याकडे करण्यात आली आहे.
वास्तविक पाहता एमआरटीपी अॅक्ट १९६६ मधील कलम ३७ नुसार आरक्षण उठवताना नगर परिषदेची सर्वसाधारण सभेची मान्यता घेणे कायदेशीर बंधन आहे. परंतु, पंढरपूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेची कोणतीही मंजुरी न घेता परस्पर गोशाळेसाठी जागा देण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे या निर्णयामुळे समस्त पंढरपूरकरांमधुन तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे
शासनाने नगर परिषदेच्या परस्पर मंदिर समितीला गोशाळेसाठी जागा देण्याचा घेतलेला निर्णय त्वरित रद्द करावा म्हणून शहरातील पंढरपूर नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, सामाजिक संस्था व पर्यावरणप्रेमी नागरिक यांनी यमाई तलावाच्या बचावासाठी मुख्यमंत्री, महसूलमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. यमाई तलाव हा शहराचा ऑक्सिजन पार्क आहे.भविष्याच्या दृष्टीने या तलावाचे अस्तित्व राहणे आवश्यक आहे तरी वरील सर्व बाबींचा विचार करून तातडीने पंढरपूर नगर परिषदेचे विशेष सर्वसाधारण बोलविण्यात यावी म्हणून नगराध्यक्षा प्रणिता भालके यांच्याकडे भाजपचे गटनेते भागवत बडवे, सुजितकुमार सर्वगोड, नगरसेवक लक्ष्मणराव शिरसट, अमोल डोके, अॅड. सुनील वाळूजकर, विनायक संगीतराव, माजी नगरसेवक गुरुदास अभ्यंकर यांच्या शिष्टमंडळाने मागणी केली आहे.यावेळी नगरसेवक ओंकार जोशी, राहुल शिंदे अक्षय गंगेकर नागेश यादव उपस्थित होते.
नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके यांनी समस्त पंढरपूरकरांच्या भावना लक्षात घेऊन आपण केलेल्या मागणीनुसार निश्चितपणाने याबाबत विशेष सर्वसाधारण सभा लवकरच आयोजित केली जाईल, असे आश्वासन दिले.



















