सोलापूर – जिल्ह्यातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींच्या मालकीच्या विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे आणि पाणीसाठा वाढविण्याच्या कामांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वेध यांनी जलसंधारण व स्वच्छता समितीच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
यंदा पावसाला विलंब झाल्याने अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची चिंता निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन उपलब्ध जलस्रोत अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असून, ज्या ग्रामपंचायतींच्या विहिरींमध्ये गाळ साचला आहे किंवा खोली वाढविण्याची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी तातडीने कामे हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला. सुरू असलेल्या योजनांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे आणि जलसंधारणाशी संबंधित विविध उपक्रमांबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. आवश्यक त्या ठिकाणी तांत्रिक अहवाल तयार करून त्वरित मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेशही देण्यात आले.
जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतींना स्थानिक पातळीवर जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले असून, जलसंधारणाच्या कामांमध्ये कोणताही विलंब सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
चौकट
जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूजल पातळी टिकवून ठेवण्यासाठी विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे, जलसाठा वाढविणे आणि पाणीपुरवठा योजनांची कार्यक्षमता वाढविणे या उपाययोजनांवर विशेष भर दिला जाणार आहे. यामुळे आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.