सोलापूर – राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून विजापूर रोडवरील श्री छत्रपती संभाजी महाराज तलाव येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ओपन जिमचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. प्रारंभी विधिवत पूजन, नारळ फोडून व फीत कापून खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ओपन जिम ही केवळ सुविधा नसून नागरिकांच्या आरोग्यातील गुंतवणूक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी खासदार प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे म्हणाल्या की, “निरोगी समाज घडविण्यासाठी नियमित व्यायाम ही काळाची गरज आहे. ओपन जिममुळे युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना अत्याधुनिक व्यायाम साहित्याचा मोफत लाभ मिळणार असून शारीरिक तंदुरुस्ती वाढण्यास, लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब व हृदयविकारासारख्या जीवनशैलीजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. नागरिकांच्या आरोग्यासाठी ही अत्यंत उपयुक्त सुविधा ठरणार आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील, अक्कलकोट तालुक्यातील तोणूर पंचायत समिती सदस्या शीतल म्हेत्रे, माजी क्रीडा अधिकारी मारेप्पा कंपली, बाबू म्हेत्रे, भीमा वाघमारे, अल्पसंख्याक प्रमुख गफूर शेख, श्याम कदम, दीपक पाटील, मिलिंद ठोंबरे, दीपक गायगवळी आदी उपस्थित होते.



















