
सोलापूर – जिल्हास्तरीय सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धेने सन २०२६-२७ या वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धेस सुरुवात होणार आहेत. या स्पर्धा २१ आणि २२ जुलै रोजी येथील वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सच्या मैदानावर होणार आहेत.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा १५ वर्षांखालील मुले/मुली आणि १७ वर्षांखालील मुले या वयोगटासाठी होतील. १५ वर्षांखालील गटासाठी खेळाडूचा जन्म १ जानेवारी २०१२ किंवा त्यानंतरचा, तर १७ वर्षांखालील गटासाठी १ जानेवारी २०१० किंवा त्यानंतरचा असावा. १५ वर्षे मुले/मुली व १७ वर्षे मुली गटाच्या स्पर्धा २१ जुलै रोजी सकाळी ९.०० वाजता, तर १७ वर्षे मुलांच्या स्पर्धा २२ जुलै रोजी सकाळी ९.०० वाजता वालचंद कॉलेज येथे सुरू होतील.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना ‘सुब्रतो मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटी’च्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. ऑनलाईन नोंदणी व स्पर्धेची प्रवेशिका जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कुमठा नाका, सोलापूर येथे किंवा dsosolapur1@gmail.com या ई-मेलवर २० जुलै २०२६ पर्यंत जमा करणे आवश्यक आहे. १७ वर्षांखालील खेळाडूंना वय निश्चिती चाचणी (Skeleton Maturity Age Determination Test) करणे बंधनकारक राहील. अधिक माहितीसाठी किरण दुस्तकर ( मो.8788192124) किंवा दत्तात्रय वरकड ( मो. 72191 55252) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे यांनी केले आहे.

















