सोलापूर – राज्यातील काही शिक्षक संघटनांनी पुकारलेल्या ‘शाळा बंद’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. आंदोलनात सहभागी होऊन शाळा बंद ठेवणाऱ्या किंवा शैक्षणिक कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्या शिक्षकांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असून, संबंधित शिक्षकांचे ‘काम नाही तर वेतन नाही’ या तत्त्वानुसार वेतन कपात करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिला आहे.
यासंदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आणि संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सर्व शाळा नियमित सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत अध्यापनाचे कामकाज सुरळीत सुरू राहावे, अशी जबाबदारी शिक्षण विभागाने संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविली आहे.
पत्रात नमूद केल्यानुसार, आंदोलनात सहभागी होऊन अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांची उपस्थिती नोंदवून त्याचा अहवाल तातडीने सादर करावा. विनापरवानगी गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याबरोबरच त्या दिवसाचे वेतनही कपात करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास संबंधित शिक्षकांकडून खुलासाही मागविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांचे हित आणि शैक्षणिक कामकाज अबाधित ठेवणे ही शिक्षण विभागाची सर्वोच्च जबाबदारी असल्याने कोणत्याही आंदोलनाचा परिणाम शाळांवर होऊ देणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांनी नियमितपणे सुरू राहून विद्यार्थ्यांना अध्यापन सेवा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहनही प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केले आहे.