अकलूज – माळशिरस तालुक्यातील वाफेगांव येथील ग्रामीण भागातील लेखक संभाजी दिगंबर सरवदे यांच्या बहुचर्चित अशा ‘झाकळ ‘ या कादंबरीचे प्रकाशन शिवपार्वती माध्यमिक विद्यालय वाफेगांव-बाभुळगांव (ता.माळशिरस) येथील शाळेचे मुख्याध्यापक अनिल पवार सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री.पवार सर म्हणाले की,आपल्या शाळेत शिकलेला माजी विद्यार्थी लेखक संभाजी दिगंबर सरवदे यांची ‘झाकळ’ ही दुसरी कादंबरी प्रकाशित होत आहे.त्याच्या ‘वावटळ’ या पहिल्या कादंबरीस वाचकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता.लेखक संभाजी सरवदे यांच्या सारखे लेखक समाजात निर्माण होऊन त्यांनी समाजामध्ये बदल घडवून समाजाला नवी दिशा देण्याचे काम केले पाहिजे.आजच्या मोबाईल इंटरनेटच्या युगात माणसाचे जीवन व्यस्त झाले असताना लेखक संभाजी सरवदे सारखे ग्रामीण साहित्यिक आपले काम जोमाने करतात.हे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.यावेळी लेखक संभाजी सरवदे म्हणाले की,पुस्तक वाचन हे विद्यार्थ्यांसाठी काळाची गरज आहे.पुस्तके ही विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवी दिशा देण्याचे काम करतात.यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईल इंटरनेट पासून अलिप्त राहून वाचनाकडे वळले पाहिजे असा मोलाचा संदेश दिला.या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास शाळेचे विद्यार्थी,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
Post Views: 11