सोलापूर : स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ निमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. या अंतर्गत तुतारी, संबळ, आणि दवंडीच्या गजरात स्वच्छतेचा संदेश देण्यात येत आहे.
स्वच्छतेचा संदेश प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा हा अभिनव उपक्रम ७ ते ९ जुलै या कालावधीत शहरातील १५ ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या पथनाट्याच्या माध्यमातून कचरा कचरापेटीत टाकणे, घंटागाडीत ओला-सुका-सॅनीटरी-विशेष काळजीयोग्य कचरा अशा चार पद्धतीने वर्गीकरण करून देणे, कचऱ्याचे RRR (Reduce-Reuse-Recycle) पद्धतीने पुनर्वापर करणे, परिसर स्वच्छ ठेवणे, सिंगल-यूज प्लास्टिकचा वापर टाळणे तसेच ‘स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर’ या संकल्पाला बळकटी देण्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

महानगरपालिकेने शहरातील सर्व नागरिकांना कुटुंबीय, मित्रमंडळी आणि परिसरातील नागरिकांसह या पथनाट्याचा लाभ घेऊन स्वच्छ, निरोगी आणि सुंदर सोलापूर घडविण्याच्या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन सोलापूर महानगरपालिकेने केले आहे. या जनजागृती उपक्रमासाठी महापौर विनायक कोंड्याल, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, भाजप शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी शशिकांत भोसले, मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे तसेच सफाई अधीक्षक (वाहन) वासुदेव नडीमेटला यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.
Post Views: 15