सोलापूर – श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर येथे सोमवारी (दि.१३ जुलै) कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. बाजार समितीत १७५ ट्रकांमधून आलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल किमान ९०० रुपये, कमाल ३,००० रुपये, तर सर्वसाधारण १,६५० रुपये असा बाजारभाव मिळाला. तर बाजार समितीमध्ये सोमवारी कांद्याची एकूण २ कोटी ९० लाख १५ हजार २५० इतकी उलाढाल झाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.
दरम्यान, बाजारातील कांद्याची आवक आणि मागणी यानुसार पुढील काही दिवसांत दरात चढ-उतार होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीचे अद्ययावत भाव जाणून घेऊनच विक्रीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गुणवत्तेनुसार दरामध्ये मोठी तफावत दिसून आल्याने कांद्याची प्रतवारी करून विक्री करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. आवक आणि मिळालेला कमाल दर पाहता, दर्जेदार कांद्याला बाजारात चांगली मागणी कायम असल्याचे चित्र सोमवारी दिसून आले.
चौकट
दोन दिवसांत कांदा बाजार नरमला; सोमवारी आवक, उलाढाल आणि कमाल दरात घसरण
श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर येथे शनिवारीच्या तुलनेत सोमवारी कांदा बाजारात मंदीचे चित्र दिसून आले. शनिवारी २१५ ट्रकांमधून ४३,०५८ पिशव्यांची आवक झाली होती, तर सोमवारी ती घटून १७५ ट्रकांमधून ३५,१७० पिशव्यांवर आली. कमाल बाजारभाव ३,२०० वरून ३,००० प्रति क्विंटल झाला, तर बाजारातील एकूण उलाढालीतही घट झाली. सर्वसाधारण दर १,६५० च्या आसपास कायम असला तरी मोठ्या व्यवहारांमध्ये मंदी जाणवली. बाजारातील मागणी आणि आवक यांचा थेट परिणाम दरांवर होत असल्याचे चित्र सोमवारी स्पष्ट दिसून आले.
चौकट
सोमवारचे बाजारभाव (प्रतिक्विंटल):
किमान : ९००
सर्वसाधारण : १,६५०
कमाल : ३,०००
एकूण आवक : ३५,१७० पिशव्या
एकूण क्विंटल : १७ हजार ५८५
एकूण ट्रक : १७५
एकूण उलाढाल : २ कोटी ९० लाख १५ हजार २५०
चौकट
शनिवारचे कांदा बाजारभाव ( प्रतिक्विंटल )
किमान : ९०० प्रति क्विंटल
कमाल दर : ३,२०० प्रति क्विंटल
सर्वसाधारण दर : १,६०० प्रति क्विंटल
एकूण आवक : ४३,०५८ पिशव्या
एकूण वजन : २१,५३९ क्विंटल
एकूण उलाढाल : ३,४४,६२,४००
एकूण ट्रक : २१५
कोट
चांगल्या प्रतीच्या कांद्याला तुलनेने अधिक दर
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी दिवसभरात बाजार समितीत सुमारे ३५,१७० पिशव्यांमधून १७ हजार ५८५ क्विंटल कांद्याची आवक झाली. बाजारात दर्जेदार आणि चांगल्या प्रतीच्या कांद्याला तुलनेने अधिक भाव मिळाल्याचे कांद्याचे आडत व्यापारी सादिक बागवान सांगितले.
कोट
ठोस उपाययोजना आवश्यक
“कांद्याला कमाल ३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत असला, तरी सर्वच मालाला हा दर मिळत नाही. बहुतांश शेतकऱ्यांच्या कांद्याला सर्वसाधारण १,६५० रुपयांच्या आसपासच भाव मिळतो. उत्पादन खर्च, मजुरी, वाहतूक आणि साठवण खर्च वाढल्यामुळे हा दरही समाधानकारक म्हणता येणार नाही. मात्र, चांगल्या प्रतीचा व योग्य प्रतवारी केलेला कांदा बाजारात आणणाऱ्या शेतकऱ्यांना तुलनेने अधिक दर मिळत आहेत. शासनाने बाजारभाव स्थिर ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकरी खंडू पवार यांनी व्यक्त केली आहे.