सोलापूर : महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने सिव्हिल चौक ते आडके हॉस्पिटलदरम्यान सिव्हिल हॉस्पिटलच्या कंपाऊंडलगत अतिक्रमणविरोधी विशेष मोहीम राबवून दोन अनधिकृत खोके निष्काशित केले तसेच सात अनधिकृत खोके आणि एक बेवारस रिक्षा जप्त करण्यात आली. याशिवाय कंपाऊंडलगत उभारण्यात आलेले अनधिकृत कट्टेही हटविण्यात आले.
या कारवाईदरम्यान अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या पथकाने परिसरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यावर भर दिला. नागरिकांच्या ये-जा करण्यास होणारा अडथळा दूर करून सिव्हिल हॉस्पिटल परिसर अधिक मोकळा व सुरक्षित करण्यात आला. संबंधितांना यापुढे सार्वजनिक जागांवर अनधिकृत अतिक्रमण करू नये, अन्यथा आणखी कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अतिक्रमण विभागाकडून देण्यात आला आहे.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण नियंत्रण अधिकारी अविनाश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी अतिक्रमण विभागाचे कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, महापालिकेने फेरीवाल्यांना निर्धारित वेळेतच व्यवसाय करण्याचे आवाहन केले आहे. व्यवसायाची वेळ संपल्यानंतर चारचाकी गाड्या, हातगाड्या व खोके स्वतःहून हटवावेत, अन्यथा अतिक्रमण विभागाकडून संबंधित अतिक्रमणे जप्त अथवा निष्कासित करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
Post Views: 34