
साने यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गट क्रमांक ८२ मध्ये लक्ष्मीनगर, साईनगर, शिवशंकर नगर, संभाजीराजे नगर, शिवाजीराजे नगर तसेच गट क्रमांक ९६ मध्ये गोकुळ नगर या नावाने प्लॉटिंग योजना राबविण्यात आली. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार या जमिनींना बिनशेती (एन.ए.) परवानगी नसतानाही प्लॉट विक्री करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या बेकायदेशीर व्यवहारामुळे हजारो सर्वसामान्य नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा करत, संबंधित जमीनमालक शेख मुश्ताक शेख आमीर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून सर्व बेकायदेशीर प्लॉट विक्री रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात ३ जून व १२ जून २०२६ रोजीही निवेदने देऊनही प्रशासनाने कोणताही निर्णय घेतला नसल्याचा आरोप साने यांनी केला आहे. त्यामुळे न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.























