सोलापूर : विविध विभागांत दीर्घकाळ विनापरवानगी गैरहजर राहूनही खुलासा न करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांना सोलापूर महापालिकेतील सेवा समाप्ती करण्यात आली आहे. अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावून तसेच वृत्तपत्रांतून जाहीर आवाहन करूनही संबंधितांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी हा आदेश जारी केला.
सेवेतून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सचिन जगन्नाथ वाघमारे (मजूर, उद्यान विभाग), उमेश मच्छिंद्र जाधव (मजूर, उद्यान विभाग), जहीर अख्तर मोमीन (फिल्टर अटेंडंट, सार्वजनिक आरोग्य अभियंता विभाग), मोहेश्वर मल्लिकार्जुन मानवी (मजूर, सार्वजनिक आरोग्य अभियंता विभाग), रामचंद्र अमृत काळे (मजूर, सार्वजनिक आरोग्य अभियंता विभाग) आणि काशिनाथ चन्नप्पा अलकुंटे (शिपाई, नगर सचिव विभाग) यांचा समावेश आहे.
महापालिकेने संबंधित कर्मचाऱ्यांना अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर वृत्तपत्रांमधून सार्वजनिक नोटीसही प्रसिद्ध करण्यात आली. नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर १५ दिवसांची मुदत देऊनही कोणताही खुलासा किंवा प्रतिवाद सादर न केल्याने ही कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या नोंदीनुसार, रामचंद्र अमृत काळे हे ४ नोव्हेंबर २०१९ पासून, सचिन जगन्नाथ वाघमारे हे २७ ऑक्टोबर २००७ पासून, जहीर अख्तर मोमीन हे २५ जून २०१५ पासून, मोहेश्वर मल्लिकार्जुन मानवी हे १७ एप्रिल २०१६ पासून, काशिनाथ चन्नप्पा अलकुंटे हे ७ मे २०२० पासून आणि उमेश मच्छिंद्र जाधव हे १६ मे २०२२ पासून विनापरवानगी गैरहजर असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
संबंधित कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ गैरहजेरीमुळे दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण झाले असून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांचे उल्लंघन झाल्याने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार त्यांना सेवेतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Post Views: 29