श्रीपूर – महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ५ मधील महादेव मंदिराजवळ असलेल्या दगडी पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील पाणी दूषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. टाकीतील पाण्यामध्ये आळ्या व जंतू आढळून आल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, या गंभीर समस्येबाबत प्रभागातील रहिवासी सुधीर शामराव भोसले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष सावंत यांना निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

या टाकीतील पाणी अनेक नागरिक पिण्यासाठी वापरतात. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या टाकीची स्वच्छता करण्यात आली नसल्यामुळे पाणी दूषित झाले असून त्यामध्ये आळ्या आणि जंतू स्पष्टपणे दिसत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, अशा परिस्थितीत हे पाणी पिणाऱ्या नागरिकांना पोटाचे विकार, जुलाब, उलट्या तसेच पाण्यातून पसरणाऱ्या इतर संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.यावर नगरपंचायतीने तात्काळ टाकीची सफाई करून निर्जंतुकीकरण करावे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारची समस्या उद्भवू नये . यासाठी नियमित स्वच्छता व देखभालीचे वेळापत्रक निश्चित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुख्याधिकारी संतोष सावंत यांनी या निवेदनाची दखल घेऊन संबंधित विभागामार्फत त्वरित पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी अशी अपेक्षा आहे .
सुधीर भोसले, गणेश चव्हाण, अर्जुन माने, महादेव जाधव, राम केंगार, दत्ता चव्हाण, मारुती जाधव, पांडुरंग भोसले, रोहन चव्हाण, आनंद केंगार, विजय चव्हाण, अभिषेक साठे, दत्तात्रय वाघमारे, प्रदीप मस्के, यश जाधव, अजित मते यांच्या वतीने सह्यांचे निवेदन देण्यात आले .




















