सोलापूर – लघुशंकेसाठी थांबलेल्या तिघा मित्रांना १० अज्ञात दरोडेखोरांनी कोयत्याचा धाक दाखवून बेदम मारहाण केली आणि तब्बल २ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज बळकावून पोबारा केला. दरोड्याची घटना विजापूर रोडवरील हॉटेल निशालगगत असलेल्या मोकळ्या मैदानात रविवार १९ जुलै पहाटे २ ते २.१५ वाजेच्या सुमारास घडली.
मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या दरोड्यामुळे विजापूर रोड परिसरातील नागरिक व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत संजय केरबा भडंगे (वय ४८, रा. आंबेडकर नगर, अय्यंगार बेकरीच्या मागे, विजापूर रोड, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
रविवारी पहाटे यातील फिर्यादी संजय भडंगे व त्यांचे मित्र रात्रीच्या सुमारास विजापूर रोडवरील हॉटेल निशालगगत असलेल्या मोकळ्या मैदानात स्ट्रीट लाईटच्या उजेडात थांबले होते. याच दरम्यान ५ वेगवेगळ्या मोटारसायकल्सवरून आलेल्या तब्बल १० अनोळखी इसमांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींपैकी काहींच्या हातात कोयते होते. कोयत्याचा धाक दाखवून त्यांना जीवे मारण्याची भीती घालण्यात आली.
फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांनी या लुटीला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि त्यांच्याकडील रोख रकमेसह सोन्याचे दागिने मिळून २ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहे .
Post Views: 7