सोलापूर : भारतीय डाक विभागाच्या रेल डाक सेवा (आरएमएस) ‘बी’ विभाग, सोलापूर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्राचे उद्घाटन गुरुवारी उत्साहात पार पडले. या केंद्रामुळे सोलापूर शहर व परिसरातील नागरिकांना आधार नोंदणी तसेच नाव, पत्ता आणि इतर तपशीलांतील दुरुस्तीची सुविधा आता एकाच ठिकाणी सहज उपलब्ध होणार आहे.
या केंद्राचे उद्घाटन उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि भविष्य निर्वाह निधी क्षेत्रीय कार्यालयाचे आयुक्त पुरुषोत्तम मीना यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रवर डाक अधीक्षक एच. ई. खडकेकर, एसपी एचक्यू पी. ए. वंगाळे, वरिष्ठ डाकपाल एस. पी. काळे, आरपीएफ निरीक्षक मारुती घोळवे यांच्यासह डाक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. रेल्वे व्हीआयपी गेटजवळील रेल डाक सेवा ‘बी’ विभागाच्या कार्यालयात हे केंद्र सुरू करण्यात आले असून, दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत नागरिकांना सेवा उपलब्ध राहणार आहे.
कार्यक्रम रेल डाक सेवा ‘बी’ विभागाचे अधीक्षक एरंडे, सहाय्यक अधीक्षक गणेश वडुरकर आणि रेल डाक निरीक्षक सी. एम. नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाचे नियोजन एन. एन. कुलकर्णी आणि प्रताप आंबेवाले यांनी केले तर सूत्रसंचालन अमोल निंबाळकर यांनी केले.
आधार नोंदणीसह विविध दुरुस्तीची कामे येथे जलदगतीने होणार असल्याने नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. या सुविधेचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागाने केले आहे.
उद्घाटन सोहळ्यास रेल डाक सेवा, सोलापूर विभागीय कार्यालय, हेड पोस्ट ऑफिसचे अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 14