सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील 249 बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव 20 जुलै रोजी झालेल्या महापालिका सभागृहाच्या बैठकीत न आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे आणि उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांची भेट घेऊन चर्चा केली.
याबाबत लवकरच विशेष सभा घेण्यात येईल असे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिले आहे, अशी माहिती युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांनी दिली.
यावेळी सभागृह नेते व उपमहापौर यांनी आयुक्त आणि उपायुक्त यादव यांच्याशी चर्चा केली असता, संबंधित प्रस्ताव सभागृह सुरू असताना उशिरा सादर झाल्यामुळे तो त्या दिवसाच्या कामकाजात समाविष्ट होऊ शकला नसल्याची माहिती देण्यात आली.दरम्यान, 249 बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी लवकरच या विषयावर विशेष बोर्ड बोलावून प्रस्ताव मंजूर करण्यात येईल आणि त्यानंतर तो शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे आणि उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी ट्रेड युनियनचे अध्यक्ष तथा कामगार नेते बापूसाहेब सदाफुले आणि पदाधिकाऱ्यांना दिले.
या प्रसंगी ट्रेड युनियनचे मार्गदर्शक इकबाल तडकल, अरुण मेत्रे, धनाजी लोंढे, सुनील शिंदे, बिभीषण गायकवाड यांच्यासह बदली रोजंदारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 12