सोलापूर : आसरा चौक परिसरातील एसबी प्लाझा या इमारतीत अतिसाराने अखेर एका महिलेचा बळी घेतला आहे. उपचार सुरू असतानाच गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. दूषित पाणीपुरवठ्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेमुळे महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.त्या इमारतीत महापालिकेचे पाणी नाही तर खाजगी बोअरचे पाणी वापरले जाते, असे स्पष्टीकरण महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी दिले.
आफरीन मुजफ्फर शेख (वय 49) असे मृत महिलेचे नाव असून त्यांच्यावर शहरातील यशोधरा रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील तीन दिवसांपासून त्यांना दूषित पाणी पिल्यामुळे उलट्या व जुलाबाचा तीव्र त्रास होत होता, असा आरोप रहिवाशांनी केला. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या डिस्चार्ज कार्डमध्येही उलट्या व जुलाबाच्या (गॅस्ट्रो )त्रासाचा उल्लेख करण्यात आला आहे.
एसबी प्लाझा इमारतीतील दूषित पाणीप्रकरणामुळे एकूण 40 रहिवाशांना विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काही रुग्णांची प्रकृती सुधारली असली, तरी या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रशासनाकडे वारंवार तक्रारी
तरीही दुर्लक्ष झाल्याचा आरोप
या इमारतीत दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी अनेकवेळा महापालिका प्रशासनाकडे केल्या होत्या. मात्र त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही. प्रशासनाने वेळेत उपाययोजना केली असती, तर हा दुर्दैवी मृत्यू टाळता आला असता, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
दूषित ड्रेनेज लाईन तातडीने बदलण्याची मागणी
घटनेनंतर संतप्त नागरिकांनी इमारतीलगतची दूषित ड्रेनेज लाईन तात्काळ बदलून सुरक्षित पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, तसेच या प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
इमारतीमध्ये त्यांचे स्वतःचे बोअरिंग : पेंटर
दरम्यान, या घटनेशी महापालिकेचा काहीही संबंध नाही. या इमारतीमध्ये त्यांचे स्वतःचे बोअरिंग आहेत, असे सार्वजनिक आरोग्य उप अभियंता रामचंद्र पेंटर यांनी सांगितले.
महापालिकेने सुरक्षात्मक
उपाययोजना केली : डॉ. माने
संबंधित महिलेचा मृत्यू अतिसाराने झालेला असला तरी तेथील नागरिक जे पाणी वापरतात ते महानगरपालिकेचे नाही. त्यांचे स्वतंत्र बोअरिंग आहेत. परंतु घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेचे पथक घटनास्थळी भेट देत सुरक्षात्मक उपाययोजना तसेच औषध गोळ्यांचे वाटपही आम्ही या इमारतीतील नागरिकांना केले होते, असे महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी स्पष्ट केले.
——-
Post Views: 19