सोलापूर – दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला सकारात्मक पाठिंबा दर्शवत वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला सोलापूर शहर व परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष करू नये, लवकरात लवकर शिक्षण मंत्री प्रधान यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. दुपारी एक वाजेपर्यंत अनेक व्यापारी आस्थापना बंद ठेवण्यात आल्या असून नागरिकांनीही बंदला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे माजी नगरसेवक रवी गायकवाड यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचे नेते रवी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शहरात बंद यशस्वी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू झालेली जनजागृती रॅली पुढे बाळीवेस, चाटेगल्ली, मधला मारुती, माणिक चौक सरस्वती चौक, नवी पेठ मार्गे पार्क चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रेली आली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत केंद्र सरकारविरोधात घोषणा बाजी केली. दरम्यान दुपारी एक वाजता पार्क चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बंद आंदोलनाचा समारोप करण्यात आला.
यावेळी चंद्रशेखर मदीखांबे, विनोद इंगळे, प्रशांत गोणेवर, सुहास सावंत, पल्लवी सुरवसे, साईद शेख, यशपाल सरवदे, विजयानंद उघडे, गौतम ठांपते, रवी थोरात, अनिरुद्ध वाघमारे आदी उपस्थित होते.






















