सोलापूर – राज्य सरकारने जाहीर केलेल्या २ लाख रुपयांपर्यंतच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी बुधवारी शासनाने प्रसिद्ध केली आहे. या पहिल्या यादीत पंढरपूर तालुक्यातील २१ शेतकऱ्यांचा समावेश असून, या लाभार्थ्यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे. कर्जमाफीच्या उर्वरित याद्या उद्यापासून प्राप्त होणार असल्याचे नवनिर्वाचित जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी सांगितले.
बुधवारी (दि. २२ जुलै) प्रसिद्ध झालेल्या पहिल्या यादीमध्ये पंढरपूर तालुक्यातील तावशी, सिद्धेवाडी, गोपाळपूर आणि खरडी या चार गावांमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये तावशी गावातील सर्वाधिक ९, सिद्धेवाडीतील ७, गोपाळपूरमधील ३ आणि खरडी गावातील २ शेतकऱ्यांना या पहिल्या टप्प्यात कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. हे सर्व शेतकरी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध कार्यकारी सोसायट्यांचे सभासद आहेत.
चौकट
सोलापूर जिल्ह्यातील ७६९४ शेतकरी पात्र
जिल्ह्यातील एकूण ११ तालुक्यांमध्ये २३,३२३ थकबाकीदार सभासद आहेत. यापैकी नव्या निकषानुसार जवळपास ७६९४ शेतकरी या कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरले आहेत. त्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.
चौकट
आधार प्रमाणीकरण अनिवार्य
कर्जमुक्ती योजनेचा लाभ प्रत्यक्ष मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. सुलभ आणि त्वरित आधार प्रमाणीकरणासाठी, प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा बँकेच्या शाखेत संपर्क साधावा. तसेच हे प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःचे आधार कार्ड, कर्ज खात्याचे आणि बचत खात्याचे पासबुक, तसेच यादीत नावापुढे नमूद केलेला विशिष्ट क्रमांक सोबत नेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Post Views: 21