वैराग – गोरगरिबांसाठी सार्वजनिक वितरण प्रणाली (रेशन) अंतर्गत मिळणाऱ्या शासकीय तांदळाची काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या टोळीवर बार्शी तालुका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी सापळा रचून तब्बल ४,६९० किलो (८० कट्टे) तांदूळ आणि पिकअप वाहनासह एकूण ८,९८,२३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौंदरे गावाजवळ पोलिसांनी रचला सापळा
बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे. यादरम्यान, रेशनच्या तांदळाची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बार्शी-सोलापूर रोडवरील सौंदरे गावच्या परिसरात सापळा रचला.
संशयास्पद वाटणारे महिंद्रा मॅक्स पिकअप (क्र. MH 13 DQ 6184) अडवून तपासणी केली असता, वाहनामध्ये वेगवेगळ्या प्लास्टिकच्या कट्ट्यांमध्ये भरलेला ४,६९० किलो तांदूळ आढळून आला.
पुरवठा निरीक्षकांच्या अहवालानंतर गुन्हा दाखल
पकडण्यात आलेला तांदूळ हा शासकीय रेशनचा असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी वाहन व धान्य ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील तपासणी व खातरजमा करण्यासाठी हा साठा तहसील कार्यालय, बार्शी येथील पुरवठा निरीक्षकांकडे पाठवण्यात आला. पुरवठा निरीक्षकांनी तपासणीअंती सदर तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणालीतील (रेशन) असल्याचा अधिकृत अहवाल दिला. या अहवालाच्या आधारे पुरवठा निरीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
‘या’ तिघांवर झाली कारवाई
शासकीय अन्नधान्याचा अपहार करून तो काळ्या बाजारात विकण्याच्या उद्देशाने वाहतूक केल्याप्रकरणी खालील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
१. दिगंबर उर्फ आमरुषी उर्फ आप्पा संभाजी सुरवसे (रा. बार्शी)
२. विवेक उर्फ भगवान संभाजी सुरवसे (रा. बार्शी)
३. अक्षय राजाभाऊ बारसकर (रा. दत्तनगर, वैराग)
पोलीस पथक
सदरची यशस्वी कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, आणि बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सपोनि अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार युवराज गायकवाड, सिद्धेश्वर लोंढे, अमृत खेडकर आणि लक्ष्मण चित्तलवाड यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि अक्षय सोनवणे करत आहेत.
“बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे, काळाबाजार आणि समाजविघातक कृत्यांविरोधातील अशा धडक कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहतील.” सहहायक पोलीस निरीक्षक बार्शी तालुका पोलीस ठाणे