पंढरपूर – श्री विठ्ठलाच्या भक्तांना माफक दरात आणि सुरक्षितपणे पंढरपूरमध्ये पोहचण्याचे रेल्वे सेवा हे प्रमुख मध्यम आहे. इथे येणाऱ्या वारकरी भाविकांना मूलभूत सेवा सुविधा देण्याबरोबरच देशातील प्रमुख तीर्थस्थळांना पंढरपूर कसे जोडता येईल यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील असल्याचे मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलाचे मंडल प्रबंधक डॉ सुजीत मिश्रा यांनी स्पष्ट केले.
रेल्वे प्रशासनाच्या वतीने पंढरपूर मध्ये जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थितांनी रेल्वेकडून अधिकच्या सेवासुविधा मिळाव्यात अशी मागणी केली. त्यावर डॉ मिश्रा यांनी आश्वासक उत्तरे दिली.
प्रवाशांच्या अडचणी समजून घेणे, त्यांच्या अपेक्षांनुसार रेल्वे सेवांमध्ये सुधारणा करणे आणि रेल्वे प्रशासन व नागरिक यांच्यात थेट संवादाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या जनसंवाद कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमादरम्यान डॉ. सुजीत मिश्रा यांनी उपस्थित नागरिक व प्रवाशांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या. त्यांनी सर्वांशी मनमोकळेपणाने संवाद साधत त्यांच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. तसेच रेल्वे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि रेल्वे सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी उपस्थितांकडून मौल्यवान सूचना व अभिप्रायही जाणून घेतले.
पंढरपूर हे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या
दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. पंढरपूर हे प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने, येथील रेल्वे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, प्रवास अधिक सुखकर व्हावा आणि रेल्वे सेवांचा दर्जा सुधारावा, यासंदर्भातही या संवादाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या कार्यक्रमास झोनल रेल्वे कन्झ्युमर कन्सल्टेटिव्ह कमिटीचे सदस्य प्रणव परिचारक, ग्राहक मंचाचे अध्यक्ष शशिकांत हरिदास, मुख्य वाणिज्य निरीक्षक अमोल जोशी, स्टेशन प्रबंधक के के मिश्रा, अंकित सिंग, आपीएफ प्रमुख सुहास जाधव, रमेश काळे आदीसह मोठ्यासंख्येने विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
Post Views: 15