सोलापूर – आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने उपवासाच्या पदार्थांच्या बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे. बटाटा वेफर्स, नायलॉन साबुदाणा चिवडा, बटाटा चिवडा आणि केळी वेफर्स यांना मोठी मागणी असून, उत्पादन खर्चात झालेल्या वाढीमुळे यंदा या पदार्थांचे दरही वाढले आहेत. त्यामुळे उपवासाची तयारी करणाऱ्या नागरिकांना यंदा अधिक खर्च करावा लागत आहे.
सोलापुरातील मिठाई आणि फराळ विक्रेत्यांकडे उपवासाच्या पदार्थांची विक्री वेगाने सुरू झाली आहे. विशेषतः आषाढी एकादशी आणि पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर उपवासाच्या पदार्थांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. मागणी वाढल्याने व्यापाऱ्यांनीही अतिरिक्त साठा उपलब्ध करून ठेवला आहे.
दरम्यान, काही महिन्यांपासून उत्पादन खर्च वाढत असल्याने दरवाढ टाळणे शक्य झाले नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. केळी वेफर्सच्या दरातही वाढ झाली आहे. कच्च्या केळ्यांच्या किमती वाढल्याने केळी वेफर्स महागले असून, ग्राहकांकडून मात्र मागणी कायम असल्याचे विक्रेते सांगतात.
कोट
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेली मोठी वाढ, खाद्यतेलाचे वाढलेले दर आणि कच्च्या मालाच्या किंमती यांचा थेट परिणाम तयार पदार्थांच्या दरावर झाला आहे.
– रविकांत तंबाके, मिठाई विक्रेते कुंभार वेस
चौकट
उपवासाच्या पदार्थांचे सध्याचे दर (प्रतिकिलो)
बटाटा वेफर्स – ₹२४०
केळी वेफर्स – ₹३२०
नायलॉन साबुदाणा चिवडा – ₹२४०
बटाटा चिवडा – ₹२४०
Post Views: 34