सोलापूर : पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत हरित सोलापूर घडविण्याच्या उद्देशाने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा (ता. अलिबाग, जि. रायगड) यांच्या वतीने रविवारी सोलापुरात भव्य महावृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.
या अभियानाअंतर्गत शहरातील दहिटणे येथील राष्ट्रतेज घरकुल परिसर आणि रे नगर येथील आरएमसी प्लांट परिसरात एकूण १ हजार ८०९ देशी वृक्षांची लागवड करण्यात आली असून, पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने हे अभियान महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून राज्यभरात वृक्षलागवड, जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणासाठी विविध उपक्रम राबवत आहे. ‘एक माणूस – एक झाड’ या संकल्पनेतून लाखो वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची परंपरा प्रतिष्ठानने निर्माण केली आहे. त्याच उपक्रमाचा भाग म्हणून यंदा सोलापुरातही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले.
दहिटणे येथील राष्ट्रतेज घरकुल परिसरात दोन गटांमध्ये वृक्षलागवड केली ग्ोली. गट क्रमांक ९२/२ मध्ये २६९, तर गट क्रमांक ८३/३ मध्ये ३७८ वृक्ष लावण्यात आले, या ठिकाणी एकूण ६४७ वृक्षांची लागवड करण्यात आली.
रे नगर कुंभारी येथील आरएमसी प्लांट परिसरात पाच वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपणाचे नियोजन करण्यात आले . गट क्रमांक ७५५ मध्ये १५५, गट क्रमांक ८४५ मध्ये २३२, गट क्रमांक ७६४ च्या डाव्या बाजूस २४०, उजव्या बाजूस ३४०, तर पाणी टाकी परिसरात १९५ वृक्ष लावण्यात आले. या परिसरात एकूण १ हजार १६२ वृक्षांची लागवड झाली आहे. सोलापूर शहरातील वाढते तापमान, कमी होत चाललेले हरित क्षेत्र आणि वाढते प्रदूषण यांचा विचार करून हे अभियान आयोजित करण्यात आले आहे. केवळ वृक्षलागवड करून थांबण्याऐवजी लावलेल्या प्रत्येक वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारीही प्रतिष्ठानचे श्री सदस्य स्वीकारणार असल्याने या वृक्षांचे जगण्याचे प्रमाण वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
या महाअभियानात प्रतिष्ठानचे शेकडो सदस्य सहभागी झाले होते. पर्यावरण संवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारत पुढील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला गेला. गेल्या दोन वर्षापासून डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रे नगर कुंभारी परिसरात तीन हजार झाडांची लागवड करून उत्तम प्रकारे संगोपन केले जात आहे. सध्या सदरची झाडे हिरवाईने भरलेली आहेत व संपूर्ण रे नगर परिसर हिरवागार दिसत आहे.






















