सोलापूर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने गोविंदश्री सभागृहात आयोजित करण्यात आलेला गायक दीपक कलढोणे यांचा ‘शांतिब्रह्म’ हा भक्तिसंगीत कार्यक्रम भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.
शनिवारी, गोविंदश्री मंगल कार्यालयात दुर्वांकुर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संत एकनाथ महाराज यांच्या जीवनचरित्रावर आणि अभंगगायनावर आधारित ‘शांतिब्रह्म’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कलढोणे यांच्या आषाढी एकादशी निमित्त संतसाहित्य व गायनसेवाव्रताचे हे २० वे भक्तिपुष्प विठ्ठल-रुक्मिणी चरणी समर्पित करण्यात आले. कार्यक्रमात ‘या पंढरीचे सुख पाहता लोचनी’, ‘कानडा विठ्ठल’, ‘काया ही पंढरी’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘रामनाम ज्याचे मुखी’, ‘देवाचा देव बाई ठकडा’ यांसह संत भानुदास महाराज यांची ‘वृंदावनी वेणु वाजे’ ही गौळण सादर करण्यात आली. तसेच कलढोणे यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘धन्य आजि दिन संतदर्शनाचा’ या अभंगाने कार्यक्रमातील भक्तिरस कळसाला गेला. विठ्ठल नामाच्या गजरात रंगलेल्या या कार्यक्रमाला श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र बँकेचे झोनल मॅनेजर मिथिलेशकुमार पांड्ये, दै.तरूण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने, डॉ. नयना व्यवहारे, एस न्यूजचे संपादक शिवाजी सुरवसे आणि गोविंदश्रींच्या मालक सौ.कांबळे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती व संत एकनाथ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी संत साहित्याचे अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी संत एकनाथ महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. भक्ती, सामाजिक समता, क्रोधविरहित कर्मयोग, मराठी साहित्यनिर्मिती तसेच ज्ञानेश्वरीच्या भाषाशुद्धीकरणातील संत एकनाथांचे योगदान यांचे त्यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले.
कलढोणे यांना संवादिनी व स्वरसाथ नीरज कलढोणे यांनी दिली. कोल्हापूरचे प्रसिद्ध तबलावादक तालमार्तंड डॉ. पं. सचिन कचोटे आणि प्रसाद कुलकर्णी यांनी तबल्याची रंगतदार साथसंगत केली. वर्धराज मिर्जी, नागराज शेट्टी व महेश जाधव यांनी अनुगायन केले. निरंजनी कलढोणे व परिणिता कुलकर्णी यांनी तानपुरा साथ दिली, तर दिलीप पोतदार व अनंत जोशी यांनी तालवाद्यांची साथसंगत केली.
या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरच्या अध्यक्षा डॉ. नयना व्यवहारे, उद्योजक महावीर गुंडाळे, ऑटोमोबाईल संशोधक राहुल बुऱ्हाणपुरे, ज्येष्ठ तबलावादक महेश पाटील, गायिका पूनम फालके, संजय नागरस, पत्रकार सिद्धाराम पाटील, पद्माकर कुलकर्णी, अभय दिवाणजी, यांच्यासह अनेक मान्यवर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. जगदीश पाटील, वैभव सुरवसे, सीमा सिंहासन, मल्लिकार्जुन कोरे, बसवराज जमखंडी, आदिंनी विशेष परिश्रम घेतले.