वैराग : “कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी…” या कर्माधिष्ठित भक्तीच्या सिद्धांताने महाराष्ट्र आणि भारतीय शेती-शेतकऱ्यांना आत्मसन्मान व प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या श्री संत शिरोमणी सावता माळी यांच्या अवतार कार्याला ७७५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून बार्शी येथे सावता माळी पुण्यतिथी उत्सव अत्यंत उत्साहात व आगळ्या-वेगळ्या अध्यात्मिक व रचनात्मक उपक्रमाने साजरा करण्यात आला.
या प्रसंगी गोमाता, भूमाता आणि शेतकरी पूजनाने ‘शेतकरी कृतज्ञता दिन’ साजरा करण्यात आला. अध्यात्मासोबतच बळीराजाच्या समृद्धीचा संदेश देणारा हा सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
१ हजार डॉर्फ नारळ व सेंद्रिय अंजीर लागवड पूजन
उत्सवाचे औचित्य साधून मा. आमदार राजाभाऊ राऊत (बार्शी) आणि अतुल कुलकर्णी (पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका ‘डॉर्फ मलेशियन नारळ क्लस्टर’ अंतर्गत १ हजार डॉर्फ (बुटके) नारळ आणि सेंद्रिय अंजीर लागवड पूजन करण्यात आले. कासारवाडी (बार्शी) येथील शेतकरी अर्जुन क्षीरसागर यांच्या शेतात हा उपक्रम पार पडला.
‘कृषी ज्ञान मंदिर’ उद्घाटन व मूर्ती प्रतिष्ठापना
‘नमो नैसर्गिक व आत्मनिर्भर कृषी व ग्राम विकास प्रबोधिनी’ (बळेवाडी, बार्शी) येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ‘श्री संत शिरोमणी सावता माळी कृषी ज्ञान मंदिराचे’ उद्घाटन व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा नुकताच अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला.
उत्सवाच्या दिवशी सकाळी धार्मिक विधी, अभिषेक, भावपूर्ण कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने उपस्थित भक्तांनी व शेतकऱ्यांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
सुयोग्य मार्गदर्शन व नियोजन
या संपूर्ण सोहळ्याची मूळ संकल्पना आणि मार्गदर्शन नानासाहेब कदम (सेवानिवृत्त डी. वाय. एस्. पी. तथा संस्थापक अध्यक्ष – नमो नैसर्गिक व आत्मनिर्भर कृषी व ग्राम विकास प्रबोधिनी, बळेवाडी, बार्शी) आणि समस्त श्री स्वामी समर्थ सेवेकरी यांचे लाभले.
तसेच उत्सव नियोजन प्रमुख वासुदेव ढगे व दिनेश नाळे यांनी सर्व कार्यक्रमाचे अत्यंत नेटके आणि सुंदर नियोजन केले. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी परिसरातील ग्रामस्थ, सेवेकरी आणि शेतकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.