मोडनिंब – महाराष्ट्रातील सर्वात मोठा श्रीफळ हंडी सोहळा श्री क्षेत्र अरण (ता. माढा) येथे संत शिरोमणी सावता महाराजांचा ७३१ वा समाधी सोहळ्यानिमित्त पार पडला. तुकाराम महाराज यांचे वंशज बाळासाहेब देहुकर महाराज व कुटुंबीय यांच्या हस्ते श्रीफळ हंडी फोडण्यात आली. या सोहळ्याला यावेळी ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माढा तालुक्याचे आमदार अभिजित पाटील,माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर,जिल्हाधिकारी एस.कार्तिकीयन, माढा उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड, माढा तहसीलदार संजय भोसले,जिल्हा परिषद सदस्य वंदना कांबळे, माजी सभापती शिवाजी कांबळे, माजी सभापती भारत शिंदे, संत सावतेबुवा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल गाजरे, अॅड. विजय शिंदे, सावता रणदिवे, सावता महाराजांचे वंशज भीमराव वसेकर, दादा महाराज वसेकर, रमेश महाराज वसेकर, सावता महाराज वसेकर, दामोदर वसेकर, अंकुश वसेकर,आदी उपस्थित होते.ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष, टाळ मृदंगाचा गजर आणि वारकऱ्यांच्या उत्साहात श्रीफळ हंडी सोहळा चांगलाच रंगला.सुमारे अर्धा तास चाललेला हा नयनरम्य सोहळा उपस्थितानी याची देहा याची डोळा पाहिला. श्रीक्षेत्र अरण या ठिकाणी हजारो श्रीफळांची हंडी बांधलेली असते.गिड्डे यांच्या या मानकऱ्यांच्या घरून समारंभपूर्वक हंडी आणून पारावर बांधली गेली. पांडुरंग व सावता महाराजांच्या पालखीसमोर रंगलेल्या या दही-काल्याच्या हंडीभोवती काही श्रद्धेचे नारळ बांधले गेले.ती हंडी फोडून हा सोहळा पार पडतो. संत तुकाराम महाराजांचे वंशज देहूकर कुंटूंबातील बापूसाहेब देहूकर,बाळासाहेब देहूकर,देहूकर कुटुंबीय यांनी श्रीफळ हंडी फोडली. अरण (ता. माढा) येथील संत सावता महाराज संजीवन समाधी मंदिरासमोर हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.श्रीफळ हंडीचा सोहळा डोळ्यात साठवून भाविक धन्य झाले.भक्तांनी व वारकऱ्यांनी वाहिलेले नारळ बांधून ही श्रीफळ हंडी तयार करण्यात येते आणि हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा नयनरम्य श्रीफळ हंडी सोहळा श्री संत सावता माळी महाराज यांच्या अरण भूमीत साजरा केला.यावेळी श्रीफळहंडीचे नारळ प्रसाद म्हणून मिळविण्यासाठी तरूणांची धडपड पाहावयाला मिळाली. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी संत सावता माळी परिसर व मंदिरावर, छतावर,ग्रामपंचायत कार्यालय, सभामंडप, यात्री निवास या इमारतींवर गर्दी केली होत..हा सोहळा पारंपरिक पद्धतीने आणि भक्तिमय वातावरणात पार पडतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानाचे श्रीफळ तोरण; पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते अर्पण
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानाचे श्रीफळ तोरण श्रीक्षेत्र अरण येथील श्रीफळ हंडी सोहळ्यास सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या श्रीफळ हंडी सोहळ्याला शुभेच्छा देत आपले श्रीफळ तोरण संत सावता महाराजांच्या चरणी आणि श्रीफळ हंडीला समर्पित केले.तसेच पांडुरंग परमात्म्याच्या पालखी सोहळ्याचे तीर्थक्षेत्र अरण येथे झालेले आगमन हा संत आणि देव यांच्या भेटीचा अद्भुत योग असल्याचे सांगत, महाराष्ट्राची प्रगती, शेती-मातीचा विकास आणि बळीराजाचे सुख-समृद्धी यासाठी संत सावता महाराज व पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना केली. तीर्थक्षेत्र अरण येथे साजऱ्या होत असलेल्या संत शिरोमणी सावता महाराज यांच्या ७३१ व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या पवित्र पर्वानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून वारकरी बंधू-भगिनी आणि भक्तगणांना शुभेच्छा दिल्या.
दही, भात, लाह्यांचा प्रसाद
श्रीफळ हंडीचा सोहळ्याला वर्षानुवर्षांची परंपरा आहे. सोहळ्यासाठी लागणारे हंडीच्या कड्याचे व हंडी फिरवण्याचा मान गिड्ढे परिवाराचा असून त्यांच्या घरून डोक्यारून वाजत गाजत मंदिराकडे आणले जाते. तसेच हंडी ही श्री संत सावता महाराज मंदिरातून त्या हंडीत दही, भात व लाह्या हे सर्व भरून मंदिरातील पुजारी श्रीफळ हंडीच्या स्थळी आणतात. त्या नंतर त्यांनी आणलेले हंडीचे कडे व हंडी ही एकत्र बांधून मंदिर प्रांगणात पारावरती उभ्या असलेल्या लोखंडी खांबाला बांधली जाते.
भक्तांनी वाहिलेले नारळापासून तयार करण्यात येते श्रीफळ हंडी
कर्मयोगी सावता महाराजांच्या समाधी सोहळ्याला प्रत्यक्ष परमात्मा श्री विठ्ठल धावून आल्याने सावता महाराजांनी पेरलेला भक्तीचा मळा भाविकांनी फुलून जातो. भक्तांनी व वारकऱ्यांनी वाहिलेले नारळ बांधून ही श्रीफळ हंडी तयार करण्यात येते आणि हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा नयनरम्य श्रीफळ हंडी सोहळा श्री संत सावता माळी महाराज यांच्या अरण भूमीत साजरा केला.