सोलापूर : “ग्रंथालय म्हणजे केवळ पुस्तकांचा संग्रह नव्हे, तर ज्ञानाच्या देवाणघेवाणीचे आणि सामाजीकरणाचे प्रभावी केंद्र आहे. ग्रंथालयातील पुस्तकांची दररोज देवघेव झाली पाहिजे. पुस्तकांच्या सहवासात राहणाऱ्या माणसांचे जीवन अधिक समृद्ध होते. विद्यार्थ्यांनी पुस्तके आपले मित्र बनवून वाचनाची सवय जोपासली पाहिजे,” असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले.
हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, अशोक चौक, सोलापूर येथे ग्रंथालय दिनानिमित्त आयोजित दोन दिवसीय ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
डॉ. शिंदे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी वाचन अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ सोशल मीडियावरील मजकूर वाचणे म्हणजे परिपूर्ण वाचन नव्हे. विद्यार्थ्यांनी मूळ ग्रंथ, पुस्तके आणि दर्जेदार साहित्य वाचले पाहिजे. पुस्तक मनुष्याला समृद्ध विचार देते आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची दृष्टी निर्माण करते. त्यामुळे पुस्तकाला आपला मित्र बनविले पाहिजे.”
“वाचन संस्कृती वाढवायची असेल तर विद्यार्थ्यांना ‘का वाचावे?’ आणि ‘कशासाठी वाचावे?’ याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. प्रत्येक ग्रंथालयाने नियमितपणे ग्रंथप्रदर्शने आयोजित करून विद्यार्थ्यांना पुस्तकांपर्यंत पोहोचविले पाहिजे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते आणि त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होते,” असेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सत्यजित शहा यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील उपलब्ध पुस्तकांची माहिती व्हावी आणि त्यांनी स्वतः पुस्तकांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने महाविद्यालयात दरवर्षी १२ ऑगस्ट ‘ग्रंथालय दिना’निमित्त दोन दिवसीय ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन केले जाते. ग्रंथालयाच्या माध्यमातून वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी उत्कृष्ट वाचक विद्यार्थ्याला ‘बेस्ट रीडर’ पुरस्कार देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या दोन दिवसीय ग्रंथप्रदर्शनासाठी कोल्हापूर येथील बेस्ट बुक्स सप्लायर्सच्या वतीने विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. साहित्य, कला, संस्कृती, इतिहास, स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्त्व विकास, व्यवसाय, व्यवस्थापन तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांशी संबंधित विविध प्रकारच्या पुस्तकांचा प्रदर्शनात समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आपल्या आवडीची पुस्तके पाहता यावीत, त्यांची माहिती मिळावी आणि वाचनाची गोडी निर्माण व्हावी, हा या ग्रंथप्रदर्शनामागील प्रमुख उद्देश आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते फीत कापून ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, प्राचार्य डॉ.सत्यजित शहा कोल्हापूर येथील बेस्ट बुक्स सप्लायर्सचे तानाजी माने, महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. संदीप लोखंडे आणि एमबीए विभागप्रमुख डॉ. प्रीतम कोठारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नवराज काळदाते यांनी केले. सूत्रसंचालन कु.पूर्वा माळवदकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. संदीप लोखंडे यांनी मानले.
हे दोन दिवसीय ग्रंथप्रदर्शन शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खुले असून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध पुस्तकांची माहिती घ्यावी आणि या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.