मोडनिंब – भक्ती, भाव आणि भगवंताच्या स्मरणात रंगलेल्या अरण (ता. माढा)येथे शुक्रवारी एक भावस्पर्शी सोहळा संपन्न झाला.श्री विठ्ठल व संत सावता महाराजांच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा पार पडली. टाळ-चिपळ्यांच्या गजरात, “जय जय रामकृष्ण हरी”च्या भक्तिगीतांत आणि अभंग गायनात दंग झालेल्या वारकरी भाविकांनी आपल्या लाडक्या पांडुरंगास गावाच्या शिवेपर्यंत चालत नेऊन, अश्रुपूर्ण डोळ्यांनी निरोप दिला.भक्तीने फुललेल्या मळ्याला देवाने आपल्या नेत्रांमध्ये साठवून घेतले. दुपारी बारा वाजता देव परतीच्या प्रवासासाठी पंढरपूरकडे निघाले.पालखी मार्गावरील राजमुद्रा ग्रुप व मोडनिंब येथे गोल या ठिकाणी बांधकाम व्यावसायिक ज्ञानेश्वर लादे यांनी व तरुणांनी एकत्र येऊन महाप्रसाद म्हणून भाविकांना भोजन दिले. मोडनिंब गोलावर या ठिकाणी शिवाजी गडेकर, माजी सैनिक रामचंद्र सुर्वे यांचे अभिषेक पूजा झाली. परतीच्या प्रवासात गिड्डेवाडी शिवारात पालखी दाखल होताच फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत झाले.पालखीच्या स्वागतासाठी गावातील महिलांनी रांगोळ्या काढल्या, तर अनेकांनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन सहभाग नोंदवला.श्री विठ्ठल पालखीवर ग्रामस्थांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली.यावेळी गिड्डे यांना मान असतो. श्री विठ्ठल पादुकांना गिड्डे कुटुंबियांच्या वतीने दुग्धाभिषेक व पूजा करण्यात आली. पांडुरंग परमात्म्यांच्या पादुकांचे विधिपूर्वक पूजन करण्यात आले. यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी पोपट अर्जुन गिडडे,दत्तात्रय शंकर गिड्डे .राजेंद्र शंकर गिड्डे, महादेव भानदास गिड्डे, अभिमान अज्ञान गिड्डे, नितीन पोपट गिडडे रोटरी अध्यक्ष निलेश गिडडे, ओंकार गिड्डे उपस्थित होते.
संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या ७३१ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठलाची पालखी पंढरपूरहून श्रीक्षेत्र अरणला आपला लाडका भक्त संत शिरोमणी सावता महाराजांना भेटावयास येत असते.विठुरायाच्या पालखीचे स्वागत, सावता महाराज पुण्यतिथी सोहळा,श्रीफळ हंडी कार्यक्रम उत्साहात पार पडले.
























