सोलापूर – शारीरिक ,मानसिक व आर्थिक छळ करून पत्नीला गळफासाने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलीस शिपाई वैभव श्रीधर सुर्यवंशी (रा. मु.पो. हराळी, ता. लोहारा, जि धाराशिव) यावर
जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक करून आज बुधवारी दुपारी येथील न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आकांक्षा वैभव सुर्यवंशी (वय २८ वर्षे, रा. न्यु पाच्छा पेठ, मस्तान हॉटेलच्या पाठीमागे गायकवाड यांचे घरात भाडयाने, सोलापूर) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पोलीस पत्नीचे नाव आहे. याबाबत मयत आकांक्षाची बहीण पियुशा व्यंकटराव मुदगले (वय २३ वर्षे रा. रामबाग कॉलनी, कोथरुड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी वैभव हा ग्रामीण पोलीस दलात असून सध्या सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.मयत आकांक्षा व वैभव चे लग्न २०१८ मध्ये झाले होते. त्यांना एक मुलगी आहे. ते दोघे सध्या अशोक चौकात भाड्याने राहत होते.
यातील मयत आकांक्षा हिने १५ ऑगस्ट रोजी यातील बहिण पियुशा हिला फोन करून, तुझे भाऊजी मला खूप त्रास देत आहेत,तुझे शिक्षण कमी आहे, तुला रुपये कमवायची अक्कल नाही, तु मला फोन करत जावू नकोस, तुझ्या मुळे मी प्रत्येक गोष्टीत हरत चाललो आहे. मला यश येत नाही, मला तुझे तोंड बघु वाटत नाही, तसेच तुझ्या पप्पांची निलंगा येथील जागा विकुन माझेवर झालेले कर्ज फेडण्यासाठी पैसे घेवून ये असे म्हणून फोनवर रडत मला आता जगु वाटत नाही, मी त्रासाला कंटाळुन माझे जिवाचे काहीतरी बरेवाईट करुन घेईन असे सांगत होती. तेव्हा फिर्यादीने स्वतः व फिर्यादीच्या आईने कॉन्फरन्स वर कॉल करून आकांक्षाला समजावून सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वा चे सुमारास आकांक्षा हिने घरात गळफास घेतला असल्याचे उघडकीस आले. ही माहिती फिर्यादीला घर मालकीनीने फोन करुन सांगितली होती.तरी वरील आरोपीने मानसिक, शारीरीक व आर्थिक त्रास देऊन बहिण आकांक्षाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी वैभव सूर्यवंशीला मंगळवारी रात्रीच अटक केली. त्याला आज येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. फौजदार शिवम येडे हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
Post Views: 65