अकलूज( प्रतिनिधी )पुणे व सोलापूर विभाग रेल्वे समितीची बैठक आज विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, पुणे येथे पार पडली. या बैठकीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघासह सोलापूर जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या रेल्वे प्रश्नांचा पाठपुरावा केला.
दादर-पंढरपूर-दादर दैनिक रेल्वे, पंढरपूर-देहू मेमू सेवा सुरू करणे, पंढरपूर-फलटण-लोणंद रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाबाबत तातडीने बैठक घेऊन प्रकल्पाला गती देण्याची मागणी केली.
माढा तालुक्यातील मोडनिंब येथे GCT कार्गो टर्मिनल सुरू करणे, बंद असलेली किसान रेल्वे सेवा पुन्हा सुरू करणे, तसेच लातूर-कुर्डूवाडी-सोलापूर व मिरज-कुर्डूवाडी-दौंड कॉर्ड लाईन प्रकल्पांना गती देण्याबाबत मुद्दे मांडले.
मिरज-कुर्डूवाडी-लातूर रोड रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व आवश्यक भूसंपादनाला गती देण्याची, तसेच माढा व जेऊर येथे येथे हुतात्मा ,उद्यान, कोईमतुर-मुंबई, पनवेल नांदेड एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी केली.
माढा सांगोला पंढरपूर तालुक्यातील,जवळा, बामणी, बाभुळगाव, म्हैसगाव व लऊळ येथे नवीन रेल्वे स्थानके सुरू करण्याबाबतही पाठपुरावा केला.
रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणामुळे शेतकऱ्यांच्या सिंचन पाइपलाइनच्या क्रॉसिंगचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली. तसेच कुर्डूवाडी-पंढरपूर जुन्या मीटरगेज मार्गालगतची रिक्त जमीन विकासासाठी वापरण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली.
यासोबतच फलटण लोणंद पुणे रेल्वेमार्गादरम्यान सिग्नलिंग यंत्रणा अद्ययावत करून रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित व गतिमान करण्याची मागणीही केली.
माढा लोकसभा मतदारसंघातील रेल्वे सुविधांचा विस्तार आणि प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा केला. यावेळी बैठकीस मा.खासदारासहीत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री राजीव श्रीवास्तव,उपमहाव्यवस्थापक श्री कुश किशोर मिश्रा,पुणे मंडल व्यवस्थापक श्री राजेश कुमार वर्मा, सोलापूर मंडल व्यवस्थापक श्री सुनील मिश्रा यांच्यासह रेल्वेच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.