जालना : जलसंधारणाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच पाणी बचत, पावसाचे पाणी अडविणे व जमिनीत जिरविणे आणि जलस्रोतांचे संवर्धन याबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त ‘महा-वॉकॅथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा!’ हा या उपक्रमाचा मुख्य संदेश असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राज्यभर विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून ‘महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात आली आहे. पाण्याचे महत्त्व, जलसंधारणाची गरज आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका याबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
*२१ ऑगस्ट रोजी वॉकॅथॉनचे आयोजन *
दि. २१ ऑगस्ट, २०२६ रोजी सकाळी ७ वाजता या वॉकॅथॉनला जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरुवात होणार असुन, घाटी – अंबड चौफुली मार्गे पोलीस मैदान परिसरात या उपक्रमाची सांगता होणार आहे. या मार्गावर सहभागी नागरिकांकडून जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. वॉकॅथॉनमध्ये लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, विविध विभागांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, विद्यार्थी, युवक, महिला तसेच पर्यावरण व जलसंधारण क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*‘वॉक फॉर वॉटर’मधून जनजागृती*
‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ अर्थात ‘माती वाचवा, पाणी वाचवा आणि उद्याचे भविष्य सुरक्षित करा’ असा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे. वाढती लोकसंख्या, बदलते हवामान, अनियमित पर्जन्यमान आणि पाण्याचा वाढता वापर या पार्श्वभूमीवर जलसंधारणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे केवळ शासनाच्या योजनांवर अवलंबून न राहता नागरिकांनीही जलसंधारणाच्या कामात सक्रिय सहभाग घेण्याची गरज या उपक्रमातून अधोरेखित केली जाणार आहे.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेनुसार पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता त्याचा स्थानिक पातळीवर साठवण व पुनर्भरणासाठी उपयोग करणे, जलस्रोत स्वच्छ ठेवणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि जलसंधारणाच्या कामांना लोकचळवळीचे स्वरूप देणे, हा या अभियानाचा उद्देश आहे.
*नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*
जलसंधारण हा केवळ शासनाचा विषय नसून प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी निगडित प्रश्न आहे. त्यामुळे ‘महा-वॉकॅथॉन’मध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश घराघरांत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून या ‘महा-वॉकॅथॉन’ उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मृद व जलसंधारण विभागाने केले आहे.




















