सोलापूर – श्रावण महिन्याचे औचित्य साधत श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या संलग्नतेने श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक, श्री सिद्धेश्वर महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, श्री सिद्धेश्वर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि श्री सिद्धेश्वर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. एकूण ६३ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. ऑफिस सेक्रेटरी नीलकंठप्पा कोनापुरे, विश्वनाथ लब्बा, गुरुराज माळगे, सुनील रिकके, काशीनाथ दर्गोपाटील, पशुपति माशाळ तसेच विश्वस्त अॅड. बाबू पाटील, महादेव चाकोते, डॉ. राजेंद्र घुली आणि विलास कारभारी यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निकचे प्राचार्य गजानन धरणे, महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य तुकाराम चव्हाण, कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ. सुरेशकुमार टी. यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे डॉ. राजेंद्र घुले यांनी सांगितले. अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, कुंभारी यांच्या वतीने डॉ. सुरेखा काडादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तसंकलनाची जबाबदारी पार पाडली.
श्रावणाच्या धार्मिक वातावरणाला सामाजिक उपक्रमाची जोड देत संस्थेने रक्तदानाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला. नियमितपणे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचा हा उपक्रम ठरला. यासह गरजूंना फिजिओथेरपी याचा लाभ देखील देण्यात आला. श्रावण महिन्यातील सोमवार आणि शुक्रवारी फिजिओथेरपी तसेच इतर आरोग्य शिबीर राबवण्यात येणार असल्याचे गुरुराज माळगे यांनी सांगितले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Post Views: 52