सोलापूर – बदली होऊन तीन आठवडे झाले आणि अधिकृतपणे पदभारही सोपवला. तरीही दक्षिण सोलापूर बांधकाम विभागातील रस्ते विकास कामांची लाखो रुपयांची बिले काढण्यासाठी एका शाखा अभियंत्याकडून जोरदार खटाटोप सुरू असल्याची चर्चा सुरु आहे. दक्षिण बांधकाम विभागातील शाखा अभियंता विलास कोंडगुळे यांच्या कार्यकाळातील संशयास्पद मोजमाप पुस्तकांची आणि निकृष्ट कामांची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मुख्यालयात बदली केली. या बदली प्रक्रियेत दक्षिण बांधकाम विभागातील शाखा अभियंता विलास कोंडगुळे यांचा समावेश आहे . त्यांनी ६ ऑगस्ट रोजी पदभार सोपवला आहे. परंतु, पदभार सोडल्यानंतरही त्यांचा दक्षिण बांधकाम विभागातील बिले काढण्याचे सुरू असल्याचे सांगण्यात येते . दक्षिणमधील अनेक गावांमध्ये झालेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांची प्रलंबित बिले मंजूर करून घेण्यासाठी त्यांची पडद्यामागून धडपड सुरू असल्याचे बोलले जात आहे.
दर्जेदार काँक्रीट रस्ता तयार करण्यासाठी महिन्याभरापेक्षा अधिक कालावधी लागतो. परंतु, या विभागात चक्क १५ दिवसांतच घाईघाईने रस्ते पूर्ण दाखवून त्यांची देयके (बिले) काढण्याची घाई सुरू असल्याची चर्चा सुरू आहे . अर्धवट आणि निकृष्ट दर्जाच्या कामांमुळरी शासकीय निधी वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याकडे वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याची चर्चा बांधकाम वर्तुळात आहे. या
बदलीच्या दिवसापासून शाखा अभियंता कोंडगुळे यांनी नोंदवलेल्या मोजमाप पुस्तकातील (MB) सर्व नोंदींची, प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत पुनर्तपासणी करण्यात यावी. रस्त्यांचा दर्जा निकृष्ट किंवा कामे अर्धवट आढळल्यास ही बिले त्वरित रोखण्यात यावीत आणि या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.


















